नांदेड : शहरात गेल्या काही दिवसात खाजगी रुग्णालयातून रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांचे मोबाईल लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. वजिराबाद पोलिसांनी चोरट्याला पकडण्यासाठी पहाटे चार वाजेपासूनच गस्त सुरु केली होती. त्यात एक मोबाईल चोरटा हाती लागला असून त्याच्याकडून १ लाख ७६ हजारांचे मोबाईल आणि इतर दागिने जप्त केले आहेत. हा चोरटा नांदेडात मोबाईलची चोरी केल्यानंतर हैद्राबादला विक्री करीत होता. ( Mobile theft from Nanded and sale to Hyderabad)
शहरातील वजिराबाद, शिवाजीनगर भागातील खाजगी रुग्णालयातून मोबाईल आणि दागिने चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली होती. पोनि.जगदिश भंडरवार यांनी गुन्हे शोध पथकाकडे आरोपीच्या शोधाची जबाबदारी दिली होती. पोउपनि प्रविण आगलावे, पोहेकॉ.दत्तराम जाधव, विजयकुमार नंदे, गजानन किडे, मनोज परदेशी, चंद्रकांत बिराजदार, संतोष बेलूरोड, व्यंकट गांगुलवार, बालाजी कदम, शेख इब्राहीम आणि शरदचंद्र चावरे यांच्या पथकाने रुग्णालय परिसरात पहाटे चार वाजेपासूनच गस्त सुरु केली. त्याचवेळी रेल्वेस्टेशनकडे जात असलेल्या एका संशयिताला पकडण्यात आले. अंगझडतीत त्याच्याकडे पाच मोबाईल आढळून आले. पाेलिस खाक्या दाखविताच त्याने रुग्णालयातील चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून पाच मोबाईल, सोनसाखळी, कानातील टॉपर्स, अंगठ्या असा एकुण १ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
मोबाईल घेवून जात हाेता हैद्राबादलाआरोपी राजू देवीदास वाघमारे रा.बळीरामपूर हा नांदेडला मोबाईल चोरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रेल्वेने हैद्राबादला जावून विक्री करीत होता. गुन्हे शोध पथकाला वाघमारे हा रेल्वेस्टेशनकडे येत असल्याची माहिती मिळाली होती. तो रेल्वेने हैद्राबादला जाणार होता. आरोपीने आतापर्यंत १८ मोबाईल चोरीची कबुली दिली.