नांदेड : नीती आयोग (एनआईटीआई) च्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अटल अभिनव मिशनअंतर्गत महाराष्ट्रातील ११६ शाळांची निवड करण्यात आली आहे़ या शाळांमध्ये अटल आधुनिक प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत़ यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मानव्य विकास शाळेचा समावेश आहे.
शालेय विद्यार्थ्यांना नवनवीन विचार कृतीत उतरविण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य, गुणांना वाव मिळावा म्हणून सदर प्रयोगशाळा स्थापन केली जात आहे़ या अभिनव उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ९२८ शाळांची निवड करण्यात आली आहे़ यामध्ये महाराष्ट्रातील ७५ शाळांचा समावेश होता, परंतु नांदेड जिल्ह्यातील एकाही शाळेचा समावेश नव्हता़ दरम्यान, दुस-या टप्प्यात ११६ शाळांची निवड केली असून त्यामध्ये नांदेडच्या देगलूर येथील शाळेला स्थान मिळाल्याची बाब दिलासा देणारी ठरली.
या शाळांमध्ये विद्यार्थ्यांमधील विज्ञानाची आवड, अभियांत्रिकी आणि गणित विषयाशी संबंधित कलागुण विकसित करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे़ ‘आधुनिक प्रयोगशाळा’ स्थापन करण्यासाठी २० लाख रूपयांचा निधी प्राप्त होणार आहे़ इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सदर प्रयोगशाळेचा लाभ घेवू शकतात़
या योजनेत महाराष्ट्रातील अहमदनगरमधील चार शाळा, अकोला येथील एक, अमरावती - ६, बीड - १, बुलढाणा - ४, चंद्रपूर -१, धुळे - २,गडचिरोली - २, गोंदिया-७, हिंगोली- १, जळगाव- ३, जालना- १, कोल्हापूर - १०, लातूर - ४, मुंबई शहर -१०, मुंबई उपनगरामध्ये चार, नागपूर - ७, नांदेड - १, नंदुरबार- १, नाशिक- ५, उस्मानाबाद-२, पुणे - ११, रायगड - २, रत्नागिरी - २, सांगली - २, सातारा - ८, सोलापूर - २, ठाणे - ३, वर्धा - २, वाशिम - ४ आणि यवतमाळ जिल्ह्यातील ३ शाळांचा समावेश आहे़