भोकर (जि़नांदेड) : पुलवामा घटनेनंतर पाकिस्तानचे विमान पाडल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. त्यावर झालेल्या तपासात अमेरिकेने सांगितले की, पाकिस्तानला दिलेली सर्व १६ विमाने सुरक्षित आहेत. यावरुन मोदींनी खोटे बोलून जागतिक स्तरावर देशाची अब्रु काढल्याची घणाघाती टीका अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली़
लोकसभा निवडणूकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांच्या प्रचारानिमित्त भोकर शहरातील मोंढा मैदानावर सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते़ मंचावर प्रा.यशपाल भिंगे, अॅड.अण्णाराव पाटील, फेरोजलाला, जाकेर चाऊस, प्रा.रामचंद्र भरांडे, प्रशांत इंगोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड.आंबेडकर म्हणाले, सध्याच्या सरकारचे चारित्र्य चोरांचे आहे़ कारण राफेल प्रकरणी पितळ उघडे पडू नये म्हणून कागदपत्रे चोरीला गेल्याचे सांगतात आणि सर्वोच्च न्यायालयात सांगतात की, कागदपत्रे समितीकडे आहेत. मंत्रालयातील कागदपत्रे जाळल्या जातात़ दहावी नापास असलेला पंतप्रधान देश कसा सांभाळणार असा प्रश्न करीत वंचित आघाडी सत्तेत आल्यास अशांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अॅड. आंबेडकर यांनी दिला.
सध्या केंद्र व राज्यातील सरकारच्या काळात विकासाची अनेक कामे बंद पडली़ कारण यांची टक्केवारी वाढल्याने कार्पोरेट करप्शन वाढल्याची टीकाही त्यांनी केली़ नोट बंदीचा अधिकार गव्हर्नरला असतो तर मग पंतप्रधाना हा अधिकार कोठून आला? देशात नोटबंदी करुन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली़ व्यापाऱ्यांना देशोधडीला लावले. येणाऱ्या काळात व्यापाऱ्यांचीही अवस्था शेतकऱ्यांसारखी झालेली दिसेल़ तेही आत्महत्येच्या मार्गाने जातील़ हे टाळण्यासाठी देशात परिवर्तन आवश्यक असल्याचे ते म्हणाले़ व्यापाऱ्यांनी हिंदू एकत्रीकरणाच्या भूलथापांना बळी पडू नये, असे सांगून शेतकरी, व्यापारी, बहुजनांनी वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी रहावे, असे आवाहनही त्यांनी केले़ वंचित आघाडीच्या या सभेला भर उन्हातही मोठा प्रतिसाद लाभला़