मोदींचे हुकुमशाही सरकार; ईडी, सीबीआय आणि पैस्यांच्या जोरावर विरोधकांचे दमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 06:17 PM2021-10-20T18:17:18+5:302021-10-20T18:18:46+5:30
घाबरवून विरोधकांना नामोहरम केले जात आहे.
नांदेड : विरोधातील मजबूत नेत्यांच्या मागे 'ईडी', सीबीआय लावून त्यांना त्रास दिला जात आहे. यावरही ते ऐकत नसतील तर पैस्यांच्या जोरावर, भीती दाखवून विरोधकांना नामोहरम केले जाते. केंद्र सरकार विरोधकांना घाबरवून हुकूमशाही राबवू पाहतेय असा आरोप राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. खरगे हे देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते.
खरगे पुढे म्हणाले, भाजपचा एकच अजेंडा आहे. कोणी देशाला आदर्श विचारांनी बनू पाहतेय, कोणी मजबूत नेता असेल तर त्याच्यावर सर्व पद्धतीने दबाव आणला जातो. ईडी, सीबीआय, पैसा याचा वापर केला जातो. सहा ते सात राज्यात कॉंग्रेस स्वतःच्या बलवर सत्ते येत असताना भाजपने दबावतंत्र वापरले. गोवा, मध्यप्रदेश, मणिपूर, उतरांचल, अरुणाचल या राज्यात हेच झाले. त्यांचे ऐकले नाही तर घाबरवून विरोधकांना नामोहरम केले जात आहे. केंद्र सरकार लोकशाही मार्गाने जाणारे नसून ही हुकुमशाही आहे अशी टीका ही यावेळी खरगे यांनी केली.