हदगाव ( नांदेड ) : 'लालच बुरी बला है' असा संतांचा संदेश आहे, तरीही काही मंडळी याकडे दुर्लक्ष करत स्वतःचे नुकसान करून घेतात. याचाच प्रत्येय उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील ग्रामस्थांना आला. हदगावच्या एका भोंदूबाबाने गावात येऊन पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून ११ लाख रुपये घेऊन ८ जूनला पोबारा केला होता. मोबाईल लोकेशनवरुन पोलीसांनी त्यास १० तारखेला नयी आबादी भागातून अटक केली आहे.
तालुक्यात सर्पमित्र म्हणून ओळख असलेला बबन भुसारे ( रा. नयी आबादी, हदगाव ) याने लोकांच्या अंधविश्वास व स्वार्थ याचा फायदा उचलत लाखो रुपये हडपले आहेत. त्याने मांत्रिक असल्याचे भासवून बेंबळीच्या लोकांचा विश्वास संपादन केला. हातचाला की दाखवित त्यांनी या लोकांना छोटासा प्रयोगही करुन दाखविला त्यामुळे लोकांचा विश्वास त्याच्यावर बसला. एक लाख रुपये पुजेसाठी देणाऱ्या व्यक्तीस एक कोटी देण्याचे आमिष त्याने दिले. एकानेच पैसे देऊन पाहण्याऐवजी काही ग्रामस्थांनी मिळून ११ लाख रुपये जमा केले. भुसारे भामट्याच्या स्वाधिन केले. पुजा करण्याचे लोकांना डोळे मिटविण्याचे आदेश देत त्यांने ११ लाख घेऊन थेट घर गाठले. तर ग्रामस्थ पैशाचा पाऊस पडणार असल्याचे स्वप्न पाहत बसले. अर्धाएक तास झाला तरी पैशांचा पाऊस पडत नसल्याने बेंबळीकरांनी डोळे उघडून बघितले तर तांत्रिक पैसे घेऊन पसार झाला होता. त्यानंतर ग्रामस्थांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली.
हदगावमधून घेतले ताब्यातविलास श्रीरंग लोकरे ( इंगळे गल्ली उस्मानाबाद) यांच्या फिर्यादीवरुन बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. भामट्याच्या फोन लोकेशनवरुन तो हदगावला असल्याचे निष्पन्न झाले. बेंबळी पोलिसांनी गुरुवारी हदगाव पोलिसांच्या सहकार्याने बबन भुसारे यास नयीआबादी येथील राहत्या घरुन ताब्यात घेतले.