नांदेड : स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य वेळेत न मिळणे, धान्य देण्यास टाळाटाळ करणे या प्रमुख कारणामुळे जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक शिधापत्रिकाधारकांनी आपले स्वस्त धान्य दुकान बदलले आहे. पोर्टेबिलिटीचा लाभ घेत ही प्रक्रिया पार पडली.
‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ या धोरणांतर्गत शिधापत्रिकाधारकांना देशभरात कुठेही धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी शिधापत्रिका पोर्टेबिलिटी सुरू करण्यात आली आहे. देशभरातील कोणताही शिधापत्रिकाधारक या सुविधेच्या माध्यमातून धान्य घेऊ शकतो. ही सुविधा असली तरीही स्थानिक पातळीवरील वाद-विवादातही पोर्टेबिलिटीचा शिधापत्रिकाधारक लाभ घेत आहेत. जिल्ह्यात १ लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारकांनी या सुविधेचा लाभ घेत स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानीला आळा घातला आहे. जादा दराने धान्य देणे, कमी धान्य देणे तसेच धान्य देण्यास टाळाटाळ करणे आदी कारणे प्रामुख्याने पोर्टेबिलिटीसाठी कारणीभूत आहेत. या सुविधेच्या माध्यमातून वाद-विवादही टाळले जात आहेत.
नांदेड शहरात जास्त बदल
(जिल्ह्यात जून २०२१ मध्ये १७ हजार ०४२ शिधापत्रिकाधारकांनी पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेतला आहे.)
त्यात सर्वाधिक नांदेड शहरातील १० हजार ४३ शिधापत्रिकाधारकांनी पोर्टेबिलिटी केली आहे.
एप्रिलमध्ये २२ हजार ५७४ आणि मार्च २०२१ मध्ये १३ हजार ७९ शिधापत्रिकाधारकांनी आपले दुकान पोर्टेबिलिटी सुविधेच्या माध्यमातून बदलले आहेत.
नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य
जिल्ह्यात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य मिळणार आहे.
आतापर्यंत २२ लाख ३५ हजार ६५१ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. दोन महिन्यांचे धान्य नियतनही मंजूर केले आहे.