- राजेश निस्ताने नांदेड - बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धाअधिक कापूस शेतकऱ्यांच्या शेतात-घरातच पडून आहे. सध्या आहे त्यापेक्षा कापसाचे आणखी कमी भाव होणार नाहीत, असा ‘सीसीआय’ला (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अंदाज आहे. भाव वाढल्यास मात्र शासकीय कापूस खरेदीतून सीसीआय ‘आऊट’ होणार आहे.
या वर्षी ‘सीसीआय’कडून राज्यात १२७ केंद्रे सुरू करण्यात आली. अलीकडे १ कोटी २५ लाख क्विंटल कापसाची (२० लाख २० हजार गाठी) खरेदी ‘सीसीआय’ने केली आहे. त्यात मराठवाडा व खान्देशात ८ लाख ८० हजार गाठी, तर विदर्भात १२ लाख २५ हजार गाठी बनतील, एवढा कापूस आतापर्यंत खरेदी करण्यात आला आहे.
२९९ लाख गाठी उत्पादन? देशात १ कोटी १६ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली. त्यातून २९९ लाख गाठी बनतील, एवढ्या कापूस उत्पादनाचा अंदाज ‘सीसीआय’ने वर्तविला आहे.आतापर्यंत देशात ७५ लाख गाठींचा कापूस खरेदी करण्यात आला. त्यात महाराष्ट्राचा वाटा २० लाख गाठींचा आहे. सध्या बाजारात कापूस गाठींना ५३ ते ५४ हजार एवढा भाव आहेआतापर्यंत राज्यात ४३ लाख गाठींच्या कापसाची खरेदी झाली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा ३६ लाख गाठी एवढा होता.
पथकाच्या आकस्मिक भेटी‘सीसीआय’च्या मुंबईतील पथकाकडून खरेदी केंद्रांवर आकस्मिक भेटी दिल्या जात आहेत. सोमवारी बीड, मंगळवारी परभणी व हिंगोलीत भेटी दिल्या गेल्या. बुधवारी अकोल्यात पथक पोहोचले.
महाराष्ट्रात ‘सीसीआय’च्या सर्व १२७ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू आहे. कुठेही तक्रारी नाहीत. तरीही आकस्मिक भेटी देऊन तपासणी केली जात आहे. शेतकऱ्याच्या कापूस खरेदीसाठी सीसीआय बांधील आहे. - एस.के. पाणीग्रही, मुख्य महाव्यवस्थापक, सीसीआय, मुंबई.