नांदेड : पतीसोबत फारकत घेतल्यानंतर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी आडकाठी ठरत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना दि. २६ जुलै २०१९ रोजी हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी येथे घडली होती. घटनेनंतर तब्बल १४ महिन्यांनी आईसह पाच जणांविरूद्ध खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
हिमायतनगर तालुक्यातील बोरगाव येथील अशोक भोजराव तवर यांचा मुलगा संदीप तवर याचा विवाह खडकी येथील कांताबाई यांच्याशी झाला होता. परंतु संदीप तवर शरिरयष्टीने कमकुवत असल्याने दोघांमध्ये नेहमी खटके उडत होते. दि. २८ मार्च २०१३ रोजी या दाम्पत्याला मुलगा झाला. परंतु अपत्य झाल्यानंतरही कांताबाई यांचे संसारात मन रमत नव्हते. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर कांताबाई यांनी हिमायतनगर न्यायालयात पोटगीसाठी अर्ज दाखल केला. त्यानुसार त्यांना पोटगीही मंजूर झाली. संदीप तवर यांनी न्यायालयाला शिवप्रसाद या मुलाचा ताबा मागितला होता. परंतु तो लहान असल्यामुळे आईकडेच त्याचा ताबा देण्यात आला.
परंतु तीन वर्षाचा शिवप्रसाद हा कांताबाई यांना मनासारखे स्थळ मिळण्यास अडसर ठरत होता. त्यामुळे कांताबाई यांनी दि. २३ जुलै २०१९ रोजी कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने मुलाला विष पाजले. उपचारादरम्यान दि. २६ जुलै रोजी शिवप्रसादचा मृत्यू झाला. या प्रकरणात तब्बल १४ महिन्यानंतर शिवप्रसादचे आजोबा अशोक भोजराव तवर यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन शिवप्रसादची आई कांताबाई, सुनंदाबाई दत्तराव सुर्यवंशी, दत्तराव देवराव सुर्यवंशी, देवराव सुर्यभान सुर्यवंशी आणि ममता दत्तराव सुर्यवंशी सर्व रा.खडकी बाजार या पाच जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि बालाजी महाजन हे करीत आहेत