किनवट (नांदेड) : शेतात आखाड्यावर झोपलेल्या माय-लेकावर अज्ञात चार जणांनी कुऱ्हाडी, दगडाने हल्ला केला. त्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना बोधडी (बु) शिवारात १३ जुलैच्या रात्री दहाच्या सुमारास घडली. १४ जुलै रोजी सकाळी शेजारच्या शेतकऱ्यांनी बघितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खून झालेल्या व्यक्तीचे नाव रामा माधव केंद्रे ( वय ४०) असे आहे.
घटनास्थळी डीवायएसपी रामकृष्ण मळघणे, पोलिस निरीक्षक देविदास चोपडे हे सकाळीच दाखल झाले. एलसीबी व फॉरेन्सिक पथकही दाखल झाले. महिना भरात बोधडी (बु) येथील खुनाची दुसरी घटना असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रानुसार बोधडी येथील रामा माधव केंद्रे (४०) व त्यांची आई गयाबाई (६५) हे दोघे बोधडीपासून २ किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे असलेल्या शेतात आखाडा करून राहात होते. १३ जुलैच्या रात्री ते दोघे झोपलेले असताना दहाचे सुमारास अज्ञात चार व्यक्ती आले. त्यांच्यामध्ये व मयत रामा केंद्रे यांच्यात झटापटी झाल्या. पुढे नाल्यापर्यंत गेले. त्याठिकाणी रामा केंद्रे याच्यावर कुऱ्हाडी, दगडाने हल्ला चढवला. त्यात रामा केंद्रे हे जागीच ठार झाले. तर त्याची आई गयाबाई यांच्या मानेला मार लागून त्यात त्या जखमी झाल्या आहेत. जखमी गयाबाईला उपचारासाठी आदिलाबाद येथे रेफर केल्याची माहिती पोलिस निरीक्षक देविदास चोपडे यांनी दिली. मयताची सासरवाडी सावरी येथील असून गत दोन वर्षांपासून ते विभक्त असल्याची माहिती मिळाली.
घटनास्थळी किनवट उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे, पोलिस निरीक्षक देविदास चोपडे, पोलिस उपनिरीक्षक दिनेश येवले, पोहेकॉ दिगंबर लेखुळे, पोकॉ प्रकाश बोधमवाड दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. नांदेडचे एलसीबीची टीम व फॉरेन्सिक स्कॉड दाखल झाल्याचे पोलिस निरीक्षक देविदास चोपडे यांनी सांगितले. महिनाभरापूर्वी म्हणजे, १० जून रोजी बोधडी (बु) येथेच पतीने पत्नीच्या डोक्यात बाजेचा ठावा मारून खून केला होता. तोच १३ जुलै रोजी दुसऱ्या खुनाची घटना घडल्याने बोधडी भागात गुन्हेगारी डोकेवर काढू पाहात असल्याचे चित्र आहे.