ऑनलाईन लोकमत
नांदेड, दि. १७ : देगलूर शहरातील अतिशय गजबजलेल्या लोहिया मैदान या बाजारपेठेच्या भागात एक महिन्याच्या मुलीस नालीत ठेवून निर्दयी माता पसार झाली. मुलीच्या सततच्या रडण्याने आजुबाजुच्या दुकानदारांनी कानोसा घेत तिला नालीतून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, लोहिया मैदान बाजार पेठेत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लहान मुलाच्या रडण्याचा सतत आवाज येत होता. येथील दुकानदारांनी या आवाजाचा कानोसा घेतला असता त्यांना जवळच्या नाल्यात स्त्री जातीचे मूल असल्याचे आढळून आले. यानंतर या मुलास बाहेर काढून त्यास स्थानिक महिलांच्या मदतीने आंघोळ व कपडे घालण्यात आले. बालिकेस रुपेश काशेटवार, राजेश आऊलवार, दिगंबर कौरवार, माधव पाटील पाळेकर, बजरंग दासरवार, भीमराव बोरगावकर, गजानन गोपछेडे यांनी पोलीस ठाण्यात नेले.
पोलिसांच्या सूचनेनुसार या मुलीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी बेंदीगुडे व परिचारिका सुभद्रा पडलवार, सुकेशिनी ढवळे, वर्षा मगडेवार यांनी तिच्यावर उपचार केले. मुलगी बर्याच वेळेपासून भुकेली असल्याचे लक्षात आल्याने महिला कॉन्स्टेबल सावित्री हणमंते यांनी तिला आपल्या अंगावरील दूध पाजताच मूल शांत झाले.
दरम्यान, लोहिया मैदानातील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात मूल नालीत ठेवतानाचे दृश्य कैद झाले आहे. शहराचे सर्व सांडपाणी लोहिया मैदान परिसरातील मोठ्या नाल्यातून नदीपात्रात जाते. याच नाल्यात बालिकेला टाकून पुढे ती नदीत वाहून जावी या हेतूने हे कृत्य केले असावे असे दिसते. सदरील मुलीस नांदेडच्या शिशुगृहात हलविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.