साक्षर भारत अभियानमधील प्रेरक व प्रेरिका २०१२ पासून ते २०१८ पर्यंत साक्षर भारत योजनेमध्ये साक्षर करण्यासाठी काम करत होते. तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ याची गाव पातळीवर जनजागृती करणे, स्वच्छतेविषयी काम करणे, जनजागृती करणे, कोरोना काळात मास्क वापरणे, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा प्रचार करणे, आदी विविध योजनांमध्ये सहभागी होऊन काम केले आहे. मात्र प्रेरक, प्रेरिका मागील अनेक वर्षांपासून मानधनापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात साक्षर भारत प्रेरक, प्रेरिका महाराष्ट्र संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, ३० एप्रिलपर्यंत मानधन न दिल्यास उपाेषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निरंतर शिक्षण व प्राथमिक शिक्षणात प्रेरक, प्रेरिकांना समाविष्ट करून शिक्षण सेवक म्हणून समाविष्ट करावे, प्रेरक, प्रेरिकांना पुढील योजनेत नियमित आदेश देण्यात यावेत, प्रेरक, प्रेरिकांना पढना लिखना अभियान तसेच साक्षर भारत अभियानात समाविष्ट करावे, शासनाच्या वेतन समान कायद्यानुसार १८ हजार रुपये मानधन द्यावे, आदी मागण्या केल्या असल्याचे जिल्हाध्यक्ष यज्ञकांत कोल्हे यांनी सांगितले.
प्रेरक, प्रेरिकांवर उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:18 AM