लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डावर शासन नियुक्त सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या निर्णयास नांदेडमध्ये शीख समाजाकडून विरोध करण्यात आला आहे़ या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी काळा दिवस पाळण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले़नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड कायद्यात सुधारणा करत दोनऐवजी शासन नियुक्त सदस्य आठ राहतील असा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार नांदेड गुरुद्वारा बोर्डावर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर येथील शीख प्रतिनिधींची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे़ गुरुद्वारा बोर्ड अॅक्ट कायद्यातही ही सुधारणा अनावश्यक आणि स्थानिक शीख समाजाला विश्वासात न घेता केल्याचा आरोप गुरुवारी आंदोलनकर्त्यांनी केला़ यापूर्वी राज्य शासनाने १२ मार्च २०१५ रोजी गुरुद्वारा बोर्डाच्या कायद्यात संशोधन करून बोर्डाच्या अध्यक्षाची नियुक्ती शासन करेल असा निर्णय घेतला होता़ या निर्णयासही विरोध झाला होता़ आता आणखी सहा सदस्य नियुक्त करून शासन स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे़ गुरुद्वारा बोर्ड कायद्यानुसार दर तीन वर्षाला निवडणुका व्हाव्यात असे अपेक्षित आहे़ त्यामुळे विद्यमान गुरुद्वारा बोर्ड बरखास्त करून तीन जागांच्या निवडणुका जाहीर कराव्यात, गुरुद्वारा बोर्ड कायद्यातील कलम ११ नुसार अध्यक्षांची नियुक्ती शासन करेल हा आदेश रद्द करून गुरुद्वारा बोर्डाच्या १७ सदस्यांना अध्यक्ष निवडीचा अधिकार देण्यात यावा आणि गुरुद्वारा बोर्ड कायद्यात बदल किंवा संशोधन करण्यापूर्वी नांदेडच्या शीख समाजाची संमती मिळवावी त्यानंतरच कायद्यात तरतूद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली़ आंदोलनात स़देविंदरसिंघ मोटरवाले, स़इंद्रसिंघ गल्लीवाले, स़देविंदरसिंघ विष्णुपूरीकर, स़अवतारसिंघ पहेरेदार, अॅड़स़मदनमोहनसिंघ खालसा, स़रविंद्रसिंघ मोदी, स़जसपालसिंघ लांगरी, स़तेजपालसिंघ खेड, स़विरेंद्रसिंघ बेदी, सग़ुरुमीतसिंघ बेदी, स़जर्नेलसिंघ गाडीवाले, स़मोहनसिंघ गाडीवाले, स़जसप्रितसिंघ रोहीत, स़नरेंद्रसिंघ लिखारी आदींची उपस्थिती होती़---श्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड कायद्यात सुधारणा करून दोनऐवजी आठ सदस्य राहतील असा निर्णय घेतला़ त्यानुसार नांदेड गुरुद्वारा बोर्डावर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथील सदस्य नियुक्तीस मान्यता दिली आहे़