Nagesh Patil Ashtikar News : खासदारसंजय राऊत यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी अडवण्यात आल्याचा प्रकार नांदेड विमानतळावर घडला. गाडी अडवण्यानंतर खासदार आष्टीकर पोलिसांवर भडकले, तर शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे विमानतळ परिसरात प्रचंड गोंधळ झाला. दरम्यान, नागेश पाटील आष्टीकर यांनी पोलीस अधीक्षकांना कॉल करून नाराजी बोलून दाखवली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत हे नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिवसैनिक नांदेड विमानतळावर आले होते. पण, पोलिसांनी खासदार आष्टीकर यांची गाडी अडवली.
नागेश पाटील आष्टीकर यांचा पोलिसांसोबत वाद
पोलिसांनी विमानतळाच्या पार्किंगमध्ये गाड्या नेण्यास मज्जाव केला. खासदार आष्टीकर यांची गाडी देखील विमानतळा बाहेर पोलिसांनी रोखली. त्यावरून आष्टीकर त्यांनी विमानतळावर चांगलाच गोंधळ घातला. आष्टीकर यांचा पोलिसांसोबत वाद घातला. पोलीस अधिकाऱ्यांना सुनावत आष्टीकरांनी पोलीस अधीक्षकांना कॉल केला आणि घडलेला प्रकार कानावर घातला.
दरम्यान, शिवसेना (यूबीटी) नेत्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा निषेध करत घोषणाबाजी केली. आष्टीकर आणि पोलिसांत वाद सुरू झाल्याने विमानतळाबाहेर गर्दी झाली होती. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि आणि विरोधी पक्षासोबत पोलिसांची वागणूक वेगळी असल्याचा आरोप आष्टीकर यांनी केला.
नागेश पाटील आष्टीकरांनी काय केला आरोप? माध्यमांशी बोलताना नागेश पाटील आष्टीकर म्हणाले, "इथले काही कर्मचारी कदाचित भाजपच्या मोडमधून अजून बाहेर पडत नाहीयेत. त्यांच्यावरचा भाजपचा जो बडगा आहे, तो अजून डोक्यात आहे. मी आता पोलीस अधीक्षकांना बोललो आहे. या लोकांचे नेहमीचेच झाले आहे."
"आमच्या शिवसेनेचे खच्चीकरण व्हावे किंवा त्यांना गर्दी दिसून नये म्हणून हा अरेरावीचा धंदा सुरू आहे. हे आम्ही सहन करणार नाही. मी पोलीस अधीक्षकांशी बोललो आहेत. ते माणसे पाठवत आहेत. मी बघतो", असा इशारा त्यांनी दिला.
पुढे खासदार आष्टीकर म्हणाले, "आम्ही मान्य करतो की, आत जाण्यासाठी प्रोटोकॉल लागतो. जिल्हाप्रमुखांकडून किंवा संपर्कप्रमुखांकडून नावे दिली गेली पाहिजे. पण, पार्किंगमध्ये येण्यासाठी कुणालाही मज्जाव करता येणार नाही. पण, अशा प्रकारचा मज्जाव हे सगळ्यांना करत असल्याने मी माझी गाडी बाहेरच थांबवली. मी एक गाडी संजय राऊतांना घेण्यासाठी पाठवली होती. त्या गाडीला यांनी अडवले. त्याच्यासोबत हुज्जत घातली", असेही आष्टीकर म्हणाले.