अर्धापूर ( नांदेड ) : भाजपचे खासदार नांदेडमध्येच बोलतात दिल्लीत बोलतच नाहीत...हिंदीच बोलता येत नाही तर इंग्लिश काय बोलणार, अशी बोचरी टीका अर्धापूर येथील कार्यक्रमात बुधवारी ( दि. १) काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ. अमर राजूरकर ( Amar Rajurakar ) यांनी खा. प्रताप पाटील चिखलीकर ( Pratap Patil Chikhalikar ) यांच्यावर केली. ( MLA Amar Rajurkar's harsh criticism om MP Pratap Patil Chikhalikar)
नांदेड जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोप होत असतात. आता जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समिती निवडणुकाजवळ आल्या असून एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. बुधवारी आ. अमर राजूरकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे शहर कॉंग्रेस कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी आ. राजूरकर यांनी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणासाठी भाजपचे खासदार चिखलीकर गप्प का ? असा प्रश्न राजूरकर यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणासाठी अशोकराव परिश्रम घेत आहेत. शहराच्या विकासासाठी चव्हाण साहेबांनी मोठा निधी दिला आहे. त्या अनुषंगाने अनेक कामे प्रगती पथावर आहेत. आगामी काळात नगर पंचायत जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आदी निवडणुका असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करावी असे आवाहन राजूरकर यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, नासेरखान पठाण, नगराध्यक्ष प्र.शेख लायक, उपनगराध्यक्ष डॉ.विशाल लंगडे, गाजी काजी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिरूपती पा. कोंढेकर, भगवान तिडके, मदन देशमुख, विजयराव देवडे आदींची उपस्थिती होती.