शेख शब्बीरदेगलूर : आर्थिक परिस्थिती आणि कोणत्याही सुविधा नसताना तालुक्यातील वंदना गिरी या शेतमजुराच्या मुलीने स्वत:च्या जिद्दीच्या बळावर एमपीएससी परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. खडतर प्रयत्न केल्यास परिस्थिती देखील बदलते, हेच वंदना यांनी सिद्ध करुन दाखविले आहे.
तालुक्यातील माळेगाव मक्ता येथील नागेंद्र गिरी हे शेतमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. त्यांना दोन मुले आणि दोन मुली असे अपत्य. वंदना सोडून इतरांचे शिक्षण जेमतेम पाचवीपर्यंतचे. पण, वंदना लहानपणापासूनच हुशार होती. त्यामुळे तिला शिकवण्याचा निर्णय नागेंद्र गिरी यांनी घेतला. वंदनाने गावातीलच जि.प. शाळेत प्राथमिक तर पंचपुरा माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी देगलूर गाठत वंदनाने विज्ञान विषयात पदवी मिळविली. पदवीचे शिक्षण घेत असतानाच २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ लिपीक असलेल्या अविनाश गिरी यांच्यासमवेत वंदना यांचा विवाह झाला. लग्नानंतरही अविनाश गिरी यांनी वंदना यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. घरातील जबादाऱ्या सांभाळत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून कोणतीही खासगी शिकवणी न लावता वंदना गिरी यांनी तयारी सुरु केली आणि पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवित पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली. देगलूर तालुक्यातील माळेगावची पहिली महिला फौजदार होण्याचा मानही वंदना गिरी यांनी मिळविला.
दोन महिन्याच्या मुलीला घरी ठेवून दिली परीक्षाएमपीएससीची पूर्व परीक्षा देत असताना वंदना गिरी यांची अन्वी ही मुलगी दोन महिन्यांची होती. पण, जिद्द उराशी बाळगून वंदना यांनी मुलीला घरी ठेवून परीक्षेसाठी माळेगाव येथून जालना गाठले आणि परीक्षा दिली. त्यानंतर मुलीला घरी ठेवूनच ग्राऊंडवर जाऊन सराव केला.
पतीचा निर्णय ठरला कलाटणी देणारापरिस्थिती हालाखीची असतानाही वडिल नागेंद्र गिरी यांनी माझ्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. लग्नानंतर माझे पती अविनाश गिरी यांनी उच्च शिक्षणासह स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिलेली मोलाची साथ माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आई,वडिल आणि पतीच्या साथीमुळेच हे यश प्राप्त करु शकले.- वंदना अविनाश गिरी, पोलिस उपनिरीक्षक