नांदेड : महावितरणने सध्या शहरात पावसाळापूर्व कामाची मोहीम हाती घेतली असून यामध्ये विद्युत तारांना अडथळा निर्माण करणार्या वृक्षांची अमानुष पद्धतीने छाटणी केली जात आहे.
तरोडा नाका ते छत्रपती चौक या पूर्णा रोडवरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली भरगच्च वृक्षराजी हे शहराचे भूषण आहे. पर्यावरण संतुलनासोबतच शहराच्या सौंदर्यात या वृक्षांमुळे मोठी भर पडली आहे. महावितरणने कुठलेही नियोजन न करता या मार्गावरील वृक्षांची अमानुष पद्धतीने छाटणी करण्याचा धडाका सुरू केला आहे. विद्युत तारांच्या आड येणार्या फाद्यांची छाटणी करण्यास विरोध नाही. परंतु कुऱ्हाडीच्या सहाय्याने अमानुषपणे वृक्षांवर होणारा घाला अनेक वृक्षप्रेमी नागरिकांना दुखावणारा ठरला आहे.
वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी आता अद्ययावत उपकरणे उपलब्ध आहेत. झाडांना इजा न होऊ देता फांद्या तोडण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. परंतु कुठल्याही शास्त्रीय पद्धतीचा अवलंब न करता क्रूर पद्धतीने कुऱ्हाडीने घाव घालून संपूर्ण वृक्षराजीच धोक्यात आणणारा आहे. हे काम नियोजनबद्धपणे महावितरणच्या देखरेखीखाली न करता कंत्राटी मजुरांद्वारे धोकादायकरित्या केले जात आहे .
गुरुवारी पूर्णा रस्त्यावर चालू असलेली ही मोहीम शुक्रवारी कॅनाल रोडवर सुरू होणार आहे.
ही अमानुष कत्तल त्वरित थांबविण्यात यावी व हे काम तज्ज्ञांच्या उपस्थितीच व्हावे अशी मागणी वृक्षमित्र फाऊंडेशनच्यावतीने महावितरणकडे करण्यात आली.