आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांवर कारवाई केली जात असून, सोबतच वीजवापरात अनियमितता आढळणाऱ्या व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांवरही मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या निर्देशानुसार नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वीजचोरी विरोधात विविध पथकांद्वारे मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत अतिरिक्त कार्यकारी अभियंता शोभा पिलंगवाड यांनी दबंग कारवाई करीत १८ ऑगस्ट रोजी श्री गिरीराज पेपर्स या उद्योगाच्या वीजवापराची तपासणी केली. यामध्ये २० एचपीचा मंजूर भार असतानाही मीटरवरील वापर हा कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पिलंगवाड यांनी सहायक अभियंता प्रशांत थोरात, सचिन कल्याणकर, प्रधान तंत्रज्ञ शेख नसीर, तंत्रज्ञ बालाजी मुदगुरे व उच्चस्तर लिपिक संतोष दराडे यांना सोबत घेऊन सखोल तपासणी केली असता श्री गिरीराज पेपर्स हे त्यांच्या मीटरला जाणाऱ्या इनकमिंग केबलला दुसरी जादा केबल जोडून अनधिकृतरीत्या केबलवरून वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले. या तपासणीत ४० एचपीचा अनधिकृत वापर झाल्याचे आढळून आले.
वीजचोरांविरोधात वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई करण्याचे श्रेय महावितरणच्या दामिनी शोभा पिलंगवाड यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाले आहे. एका महिला अधिकाऱ्यांने पुढाकार घेत वीजचोरांविरोधात केलेली कारवाई कौतुकास्पद ठरत आहे. यापुढेही अशा प्रकारची कारवाई करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त करीत केवळ कारवाई न करता श्री गिरीराज पेपर्स कडून चोरलेल्या विजेच्या युनिटचे व दंडाची रक्कम असे एकत्रित ९ लाख ३१ हजार ७३० रुपयांची वसुलीही केली आहे.
परिमंडळातील नांदेड, परभणी व हिंगोली या तीनही जिल्ह्यातील सर्व उपविभागाअंतर्गत येणाऱ्या वीजचोरी बहुल गावांमध्ये त्याचबरोबर वीज चोरून वापरणाऱ्या औद्योगिक व व्यावसायिक वीज ग्राहकांवर वीजकायदा २००३ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेत अडथळा आणणाऱ्या विरोधात तत्काळ गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिला आहे.