नांदेड : कोरोनापश्चात, तसेच अनियंत्रित रक्तशर्करा असलेले व स्टेरॉईड्स आणि इतर औषधांचा वापर झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार आढळून येत आहे. डॉ. श.च.वै.म. रुग्णालय येथे एप्रिलच्या अखेरपासून या आजाराची लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत १८८ रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार झाला होता. शासकीय रुग्णालयात १८८ रुग्णांपैकी ११८ रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. त्यात अनेकांच्या डोळ्याला बाधा झाली होती.
यामध्ये सर्व रुग्णांवर नाकातून दुर्बिणीद्वारे (एन्डोस्कोपी) शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापैकी ३४ रुग्णांमध्ये चेहऱ्याच्या वरच्या जबड्याची शस्त्रक्रिया करून कमी-जास्त प्रमाणात वरचा जबडा काढावा लागला, तसेच आतापर्यंत ९२ रुग्णांना डोळ्याच्या म्युकरमायकोसिसची बाधा झालेली आहे. कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस होण्याचा धोका अधिक असतो. नांदेडात या आजाराचे रुग्ण आता बरे झाले आहेत, तर अनेक रुग्णांनी हैदराबाद आणि औरंगाबाद येथे धाव घेतली होती. आता मात्र कोरोनाप्रमाणेच म्युकरमायकोसिसचे रुग्ण घटले आहेत.
औषधींचा पुरेसा साठा कधी उपलब्ध
विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यासाठी या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक कार्यरत आहेत. कान, नाक व घसातज्ज्ञांकडून म्युकरच्या अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ॲटीफंगल, तसेच इतर सर्वच प्रकारची औषधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे औषधांचा तुटवडा सध्या तरी नाही.
४ जणांचा एक डोळा निकामी
रुग्णालयातील नेत्ररोगतज्ज्ञांनी डोळ्याची तपासणी करून या रुग्णामध्ये बुरशीनाशक औषध (एम्फोटेरिसीन बी) हे इंजेक्शन डोळ्यामागे देऊन रुग्णाचा डोळा वाचविला, तसेच ४ रुग्णांमध्ये पूर्ण डोळा शस्त्रक्रिया करून काढण्याची वेळ आली. सध्या ३४ रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यांच्यावर कान, नाक, घसा या विभागात तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती आता ठणठणीत होत आहे; परंतु शस्त्रक्रिया केल्यामुळे विश्रांतीची गरज आहे.