मुदखेड : येथील रेल्वेस्थानक आणि परिसराला अस्वच्छतेचा विळखा पडला असून या अस्वच्छतेचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ नगर परिषद राबवत असलेल्या स्वच्छता मोहिमेला रेल्वे प्रशासनाकडून मात्र हरताळ फासला जात आहे.शहरानजीक असलेल्या मुदखेड रेल्वेस्थानकावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रवेशद्वाराजवळ व तिकीट खिडकीजवळील भिंती गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. स्टेशन परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवाशांना नाक मुठीत धरून रेल्वेयात्रा करावी लागत आहे. हे रेल्वेस्थानक अस्वच्छतेमुळे विळख्यात सापडल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. मुदखेड येथील जुन्या रेल्वेस्थानकात स्वच्छता व सोयी-सुविधांबाबत अभाव आहे. उपाहारगृह चालकाकडून अस्वच्छता पसरविली जात असल्याचे अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे. स्टेशनमध्ये कचरा टाकण्यासाठी ठेवलेल्या कचराकुंड्या योग्य पद्धतीने ठेवल्या नसून तीन प्रकारच्या कचराकुंड्या ठेवण्याचे वरिष्ठ पातळीवरुन आदेश असताना एकच जुन्या प्रकारची तुटक्याफुटक्या कचराकुंड्या दिसून येत आहेत. रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेचे संपूर्ण कंत्राट बी.आर.चव्हाण आणि ए.आर. चौधरी यांना दोन वर्षांसाठी यांना दिले असून ही संपूर्ण जबाबदारी कंत्राटदाराची आहे, असे रेल्वे प्रशासन सांगितले जात असून जबाबदारी झटकली जाते आहे. कंत्राटदाराकडून स्वच्छतेच्या कामासाठी दहा जण हजेरीपटावर दाखवून केवळ दोन ते तीन जण काम करत असल्याचे रेल्वे विभागाच्या एका वरिष्ठ कर्मचाºयाने सांगितले आहे. मुदखेड रेल्वेस्थानकात अनेक प्लॅटफॉर्मवर घाणीचे साम्राज्य असून साफसफाईच्या नावाने बोंबाबोंबच आहे. रेल्वेस्थानकात नित्यनेमाने साफसफाई केली जात नाही.
- सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे अशा परिस्थितीत प्रवाशांनी प्रतीक्षालयातील घाणीमुळे थांबायचे कसे ? त्यामुळे प्रतीक्षालय व परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी होत आहे.
प्रचंड दुर्गंधी पसरलीस्थानकातील प्रतीक्षालयाची दुरवस्था झाली असून, ते नियमितपणे उघडले जात नसल्याने प्रतीक्षालयात घाण वास येतो. विशेषत: प्रतीक्षालयातील शौचालयाची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने त्यात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. येथील रेल्वे कर्मचाºयांच्या मनमानीवर वरिष्ठ अधिकाºयांचा वचक राहिला नाही. रेल्वे कर्मचाºयांच्या या मनमानीला तात्काळ लगाम बसणे गरजेचे आहे़ प्रवासी विचारणा करण्यास गेल्यास त्यांना संबंधित कर्मचारी माहिती न देता उद्धटपणाची वागणूक देत असल्याचे चित्र आहे़