- दत्तात्रय कांबळे
मुखेड : तालुक्यात मागील वर्षभरात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर घटल्याचे चित्र असून येथील उपजिल्हा रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढल्याने गरोदर मातांना दिलासा मिळत आहे़ जिल्ह्यात रुग्णालयाने एक वर्षात उद्दिष्टाच्या तीनपट काम केले असून जानेवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या कालावधीत एका वर्षात १ हजार ६५१ नॉर्मल प्रसूती तर ४६ सिझेरीयन व यातील ६ मातांना जुळे बाळ जन्मले असे एकूण १ हजार ७०३ बालके जन्मले. यात ८६२ मुले, ८४१ मुलींनी जन्म घेतला असून मुलापेक्षा मुलींचे प्रमाण मात्र कमीच आहे.
मुखेडचे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय असून आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभाग असून वेगवेगळ्या आजारावर शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने शहर व ग्रामीण भागातील रुग्णांची लाखो रुपयांची बचत होत आहे. रुग्णालयात डोळ्यांचे शस्त्रक्रिया, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, सिझेरीयन, अपंडेक्स, हार्निया, हायड्रोसिल अशा इतरही शस्त्रक्रिया होत असल्याने आता याचा चांगलाच फायदा रुग्णांना होत आहे. या उपजिल्हा रुग्णालयात दर दिवस बाह्यरुग्ण रुग्णसंख्या पाहिली तर ७०० ते १००० च्या आसपास होत असते. तर अॅडमिट संख्या ही दिवसाला ६० ते ७० आहे. तर अपघात विभाग व प्रसूती विभाग २४ तास रुग्णसेवेसाठी उपलब्ध करण्यात आल्यामुळे याचा अधिक रुग्णांना फायदा होत आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. के. टाकसाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रमेश गवाले, डॉ.अनंत पाटील, डॉ.सुधाकर तहाडे, सर्जन डॉ. गोपाळ शिंदे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत खंडागळे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शोभा देवकते, वैद्यकीय अधिकारी बालाजी बिडवे, डॉ़ प्रसाद नुनेवार, भूलतज्ज्ञ डॉ. अर्चना पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा कळसकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.रमाकांत गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप काकांडीकर व डिलेव्हरी विभागातील परिसेविका कविता गिरी, अधिपरिचारिका प्रतिभा हळदेकर, वैशाली कुमठेकर, सीमा मुंडकर, शोभा कासेवाड, विद्या मुंडकर या सह रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.उपजिल्हा रूग्णालयाच्या डिलिव्हरी विभागात उद्दिष्टापेक्षा जास्त काम होते. या विभागात काम करतेवेळी अनेक अडचणी येतात. वॉर्डात बेडची कमतरता, रुग्णांना स्वतंत्र रूम नाहीत, कमी वजनाच्या नवजात बालकांना अतिदक्षता विभाग व फोटो थेरपी, वॉर्मर व आॅक्सिजन सुविधेची कमतरता, बऱ्याच वेळा १०८ सुविधा अॅम्बुलन्सची नेहमीच अडचण व या भागात सुरक्षेसाठी भौतिक साहित्यांची कमतरता असून या उणिवा भरुन काढणे गरजेचे आहे. डिलिव्हरी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
वर्षभरात झाल्या १ हजार ६५१ नैसर्गिक प्रसूतीउपजिल्हा रुग्णालयाचे दरमहा ५१ उद्दिष्ट असून वर्षाचे ६१२ उद्दिष्ट आहे. तर हे उद्दिष्टांच्या तिप्पट काम एका वर्षात जानेवारी २०१९ ते ३१ जानेवारी या कालावधीत १ हजार ६५१ नॉर्मल प्रसूती, ४६ सिझेरीयन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. ६ जुळ्यासह १ हजार ७०३ बालकांचा जन्म झाला. यात ८६२ मुले तर ८४१ मुलींची संख्या आहे. गरोदर महिला रुग्णांच्या सेवेसाठी मोफत सोनोग्राफीची व्यवस्था करण्यात आली आहे. एक्सरे, थुंकी, लघवी, ब्लड चेक केले जाते़ यामुळे उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी मुखेड तालुक्यासह शेजारच्या तालुक्यांतून मोठ्या संख्येने रुग्ण येतात.
उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्णांची संख्या मोठी असून दररोज ५० पेक्षा जास्त रुग्ण अॅडमिट होत असतात तर अपघात व प्रसूती विभाग २४ तास सेवा देत असते़ मात्र, दवाखान्यात भौतिक सुविधा व कर्मचाऱ्यांची संख्या पाहता वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व मंजूर पदांचा विचार केला तर अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे पदे रिक्त, प्रतिनियुक्ती, बदली यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन कर्मचारी संख्येत वाढ करण्याची नितांत गरज आहे -डॉ़ एस. के. टाकसाळे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मुखेड