पथदिवे सुरू करण्याची मागणी
भोकर- शहरातील मुख्य रस्त्यासह परिसरातील अनेक ठिकाणच्या गल्लीतील अंतर्गत रस्त्यावरील विद्युत दिवे बंद असून, रात्री आंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. अंधाराचा फायदा घेऊन रात्री वाहनधारकांना लुटण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे या रस्त्यावरून ये - जा करण्यास नागरिक भीत आहेत. पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.
अर्धापुरात जल्लोष
अर्धापूर- पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी विजय प्राप्त केल्याने अर्धापुरात महाविकास आघाडीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस संजय देशमुख, बालासाहेब गव्हाणे, संतोष कपाटे, गोविंद सिनगारे, राजेश्वर शेटे, शेख लायक आदी उपस्थित होते.
बिलोलीत आतषबाजी
बिलोली- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅट्ट्रिक केल्याबद्दल बिलोली येथील जुन्या बसस्थानक चौरस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी नागनाथ पाटील सावळीकर, अर्जुनराव अंकुशकर, नगरसेवक अनुप अंकुशकर, नगरसेवक प्रकाश पोवाडे, नगरसेवक जावेद कुरेशी आदी उपस्थित होते.
ग्रंथपाल रफिक यांचा सत्कार
कंधार - जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ डिसेंबर रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे दिव्यांग सहायक ग्रंथपाल मोहमद रफिक सत्तार यांचा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकहर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मोहमद हामेदोद्दीन यांची उपस्थिती होती.
शिंदे यांची बदली
नायगाव- दीड वर्षापूर्वी रामतीर्थ पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांची ३ डिसेंबर रोजी बदली झाली असून, त्यांच्या जागेवर राजसाहेब मुत्येपोड यांची नियुक्त करण्यात आली आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात रामतीर्थ पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या अचानक झालेल्या बदलीने एकच चर्चा सुरू झाली आहे.
शेतकरी वाऱ्यावर
शिवणी- किनवट तालुक्यातील शिवणी परिसरातील खरीप हंगाम जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीबद्दल शासनाकडून दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु दिवाळी होऊन २० दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी मदत मिळाली नाही.