काेराेना काळात सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाने पॅकेजअंतर्गत ५० लाख रुपयांच्या रकमेचे विमा कवच जाहीर केले हाेते. काेराेनाबाधित हाेण्याच्या आधी १४ दिवस तो ड्युटीवर असावा, ही प्रमुख अट त्यावेळी घातली गेली हाेती; परंतु आजही या अटीमध्ये बसणाऱ्या आराेग्य कर्मचाऱ्यांचे दावे अप्रत्यक्षरित्या सर्रास नाकारले जात आहेत. त्यासाठी तुमच्याकडे काेराेना काळात ड्युटी करण्याबाबतचा वरिष्ठांचा आदेश आहे का, तुम्ही किती पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आला, त्यांची यादी द्या, अशा जाचक अटी अचानक पुढे करण्यात आल्या आहेत. काेराेना काळात अनेक कर्मचारी माैखिक आदेशानेच सेवा बजावत हाेते. लेखी आदेश द्या, असे म्हणायलाही त्यावेळी कुण्या कर्मचाऱ्याला वेळ नव्हता आणि तशी मागणी केली असती तरी, कदाचित ती बेशिस्त व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हाही ठरली असती. परंतु सध्या याच जाचक अटी पुढे करून विमा दाव्यांच्या फायली अडविण्यात येत आहेत. मुंबई, नांदेड, औरंगाबाद, अंबाजाेगाई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या व काेराेनात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तर अक्षरश: वैताग आला आहे. आधीच कुटुंबातील सदस्य गमावला त्याचे दु:ख, वरून दाव्यांसाठी मंजुरी मिळविताना त्यांच्या नाकीनऊ आले आहेत.
काेराेनातील फायलींचा मुंबई-दिल्ली-पुणे प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:17 AM