महापौर मोहिनी येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत महापालिकेची हद्दवाढ करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव बहुमताने संमत करण्यात आला. तत्कालीन नांदेड नगरपालिका आणि वाघाळा नगरपालिकेचे एकत्रीकरण करून १९९७ मध्ये नांदेड वाघाळा महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर २००९ मध्ये तरोडा आणि ब्रह्मपुरीचा भाग महापालिकेत समाविष्ट करण्यात आला होता. शहरालगत सध्या मोठ्या प्रमाणात वस्तीवाढ होत आहे. या भागांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे. परिणामी महापालिकेची हद्दवाढ आवश्यक असल्याचे सभागृह नेते वीरेंद्रसिंग गाडीवाले यांनी सांगितले. माजी महापौर अब्दुल सत्तार यांनीही हद्दवाढ आवश्यक असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत आणि भाजपच्या वैशाली देशमुख यांनी या ठरावाला विरोध दर्शवत यापूर्वी समाविष्ट झालेल्या भागात अद्याप मूलभूत सुविधा पुरविता आल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. सभागृहात बहुमताने हा ठराव संमत केला.
सभेनंतर महापौर मोहिनी येवनकर यांनी महापालिकेची हद्दवाढ आवश्यक असल्याचे सांगितले. शहरालगतच्या वाढत्या वस्तींचा ताण महापालिकेवर पडत आहे. त्यामुळे हे भाग महापालिकेत घेऊन त्यांचा विकास करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या. स्थायी समितीचे सभापती गाडीवाले यांनीही महापालिकेलगत मोठ्या प्रमाणात वस्तीवाढ होत आहे. तरोड्याचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर १५० कोटी रुपये विशेष निधी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आणला होता. यातून तरोड्यात रस्ते, जलकुंभ, ड्रेनेज लाईन, आदी विकासकामे झाली आहेत. त्याच धर्तीवर हद्दवाढीनंतर समाविष्ट झालेल्या भागांचा विकास केला जाईल, असेही ते म्हणाले.
शहरातील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याबाबत बहुतांश सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. विष्णुपुरी प्रकल्प भरलेला असतानाही शहराला पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. शहरातील सर्वच भागांत ही परिस्थिती असून पाणीपुरवठा विभाग कोणते नियोजन करीत आहे, असा प्रश्न बापूराव गजभारे यांनी विचारला. किशोर स्वामी यांनीही पाणीपुरवठा विभाग विद्युतपंप, विद्युत पुरवठा यांबाबतच्या अडचणी सांगत आहे. मात्र त्यावर तोडगा काढण्याचे कामही पाणीपुरवठा विभागाचेच असल्याचे ते म्हणाले.
ॲड. महेश कनकदंडे, फारूख अली, अपर्णा नेरलकर, आनंद चव्हाण, अब्दुल शमीम, उमेश चव्हाण, संजय पांपटवार, सतीश देशमुख यांनी पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले. या विषयावर कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिलेल्या खुलाशावर सदस्यांचे समाधान झाले नाही. अखेर आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी पाणीप्रश्नावर प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. १९९६ तसेच २००८-०९ या काळातील विद्युतपंप आता नादुरुस्त होत आहे, ही यंत्रसामग्री बदलण्याचा आराखडा तयार केला असून, त्याबाबत बुधवारी निविदाही प्रसिद्ध झाल्याचे ते म्हणाले. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सभागृहानेही प्रयत्न करावेत असे ते म्हणाले. शहरातील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याबाबत बहुतांश सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. विष्णुपुरी प्रकल्प भरलेला असतानाही शहराला पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. शहरातील सर्वच भागांत ही परिस्थिती असून पाणीपुरवठा विभाग कोणते नियोजन करीत आहे, असा प्रश्न बापूराव गजभारे यांनी विचारला. किशोर स्वामी यांनीही पाणीपुरवठा विभाग विद्युतपंप, विद्युत पुरवठा यांबाबतच्या अडचणी सांगत आहे. मात्र त्यावर तोडगा काढण्याचे कामही पाणीपुरवठा विभागाचेच असल्याचे ते म्हणाले.
चौकट - कल्याणकरांची ठरावाला संमती
मुंबईत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महापालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीस नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हेही उपस्थित होते. बैठकीनंतर कल्याणकर यांच्याशी महापालिकेच्या हद्दवाढीबाबत चर्चा केली होती. त्यावर सकारात्मक भूमिका घेत नगरविकास विभागाकडून विशेष निधी मंजूर करून या भागांचा विकास करता येईल, असे कल्याणकर यांनी सांगितले होते, असे सभागृह नेते गाडीवाले यांनी सांगितले.