नांदेड: तक्रारदाराच्या घरावरील कारवाई टाळण्यासाठी १० हजार रूपयांची लाच स्विकारताना नांदेड-वाघाळा महापालिकेच्या वसूली लिपिकाला नांदेड येथील 'एसीबी'च्या पथकाने आज रंगेहाथ पकडले. व्यंकट विठ्ठलराव गायकवाड असे आरोपी लिपिकाचे नाव आहे.
सदरील घटना नांदेड-वाघाळा शहर मनपाच्या 'सिडको'अर्थातच झोन क्रमांक ६ अंतर्गत असलेल्या कौठा नांदेड येथे घडली आहे. लाच स्विकारणाऱ्या महापालिकेच्या वसूली लिपिकाचे नाव व्यंकट विठ्ठलराव गायकवाड (रा. करबला रोड, नांदेड) असे आहे. तक्रारदार यांच्या घरावर अतिक्रमणाची कारवाई प्रस्तावित होती. अतिक्रमणाची कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडे लिपिक गायकवाड याने १० हजाराची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.
यानंतर एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. आज सापळा लावून लाच घेताना लिपिक गायकवाड याला रंगेहाथ पकडण्यात आले. लिपिक व्यंकट विठ्ठलराव गायकवाड याचे मुळपद शिपाई असून, सद्या त्याच्याकडे वसूली लिपिक पदाचा अतिरिक्त पदभार असल्याची माहिती नांदेड 'एसीबी' अर्थातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे हेड कॉन्स्टेबल किशन चिंतोरे यांनी दिली.