लोकमत न्यूज नेटवर्क
बहाद्दरपुरा (जि. नांदेड) : कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथे दोरीने गळा आवळून विवाहितेचा खून करण्यात आल्याची घटना ३१ मार्च रोजी घडली. कंधार पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. मयत विवाहितेने माहेरहून २ लाख रुपये आणावेत, असा तगादा तिच्यामागे सासरच्या मंडळींनी लावला होता.
पानभोसी (ता. कंधार) येथील दुर्गा ग्यानोबा गायकवाड (वय २१) हिचा विवाह बहाद्दरपुरा येथील ग्यानोबा गायकवाड याच्यासोबत दोन वर्षांपूर्वी झाला होता. पती ग्यानोबा, सासरा नागोराव व दीर गिरीष या तिघांनी रिक्षा खरेदीसाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हूणन दुर्गाकडे तगादा लावला होता. यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळही करण्यात आला. यानंतरही पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याचे दिसताच ३१ मार्च रोजी दुपारी ३.३०च्या दरम्यान आरोपींनी दुर्गाचा दोरी व स्कार्फने गळा आवळून तिला जीवे मारले.
सुरुवातीला या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून पोलिसांनी नोंद केली होती. गुरुवार, १ एप्रिल रोजी दुर्गाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त आरोपींविरूद्ध कंधार पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. प्रभारी पोलीस निरीक्षक संग्राम जाधव अधिक तपास करत आहेत.