भोकर : तालुक्यातील रिठ्ठा येथे एका २४ वर्षीय बांधकाम मिस्त्रीचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. माधव दशरथ शकीरगे (रा. रिठ्ठा ता. भोकर) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
माधव दशरथ शकीरगे यास एक मोठा भाऊ आहे. तो कामानिमित्त कुटुंबासह तेलंगणा राज्यात वास्तव्यास आहे. त्यामुळे माधव रीठ्ठा येथे एकटाच राहत असे. आज सकाळी माधव घराबाहेर पडला नसल्याने शेजारील नातेवाईकांनी पाहणी केली. नातेवाईक महिलेने दरवाजा उघडून पाहिल्यावर माधवचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या तोंडावर, गुप्तांगावर वार करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच घटनास्थळी दारुच्या रिकाम्या बाटल्या व गुटख्याच्या पुड्या दिसून आल्या आहेत.
माहिती मिळताच पो. नि. नानासाहेब उबाळे, सपोनि अनिल कांबळे, दिगंबर पाटील, एएसआय संभाजी हनवते, नामदेव शिळाळे यांनी घटनास्थळी येत पाहणी करून पंचनामा केला. माधव याचे खुनी आणि खुनाचे कारण अद्याप समोर आले नाही. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.