- शिवाजी राजूरकर
नांदेड: नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार दिवसांपासून खुनांची मालिका सुरू असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. नांदेड शहरातील हिलाल नगर येथील २४ वर्षीय सय्यद सलमानचा १४ जुलै रोजी पहाटे खून झाला. ही घटना ताजी असतानाच नवीन मुजामपेठ येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात १७ जुलै रोजी पहाटे रहिमपूर येथील २६वर्षीय शेख शाहबाज याचा खून झाला. तर त्याच दिवशी काही तासानंतर बळीरामपूर येथील २६ वर्षीय भैय्यासाहेब उर्फ अमोल लांडगे या तरूणाचा तीक्ष्ण शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. चार दिवसांत तीन खुनाच्या घटना घडल्याने नांदेडच्या ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.
नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गौतमीनगर, बळीरामपूर (ता.जि.नांदेड) येथील भैय्यासाहेब उर्फ अमोल रामेश्वर लांडगे १७ जुलै रोजी रात्री सात वाजेदरम्यान त्यांच्या घराजवळ थांबले होते. दरम्यान, बळीरामपूर येथील दोन ते तीन तरूणांनी त्यांच्याकडील तीक्ष्ण शस्त्राने अमोल लांडगे यांच्या पोटावर, डाव्या छातीवर अनेक जबर वार केले. गंभीर अवस्थेत नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी रात्री साडेअकरा वाजेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय रूग्णालयामधील चौकीत कार्यरत पोलीस अंमलदार वामनराव कांबळे व तुकाराम नागरगोजे यांनी दिली.
दोन संशयित आरोपी ताब्यात या प्रकरणी पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सचिन गढवे व पोलीस ठाणे अंमलदार नामदेव सूर्यवंशी यांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे.