उमरी (जि.नांदेड): बॅनर लावण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना निमटेक ता. उमरी जि. नांदेड या गावात घडली. महेश सुरेशराव पाटील (वय २९) व्यवसाय शेती रा . निमटेक ता. उमरी असे मयत तरुणाचे नाव आहे.
९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मयत महेश हा आपल्या शेताकडून घराकडे मोटरसायकलवरून येत होता. यावेळी गावात आल्यावर आरोपीने बॅनर लावण्याच्या कारणावरून महेश यास जबरीने आपल्या घरात नेऊन पकडून ठेवले. यावेळी इतरांनी त्यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यातील एकाने डोक्यात बॅटने मारून महेशला गंभीररित्या जखमी केले. यामुळे महेश हा बेशुद्ध पडला. लगेच त्यास उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यावेळी काही नातेवाईकांच्या आग्रहास्तव जखमी महेश यास तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
हेही वाचा - पूर्ण लसीकरणानंतरच महाविद्यालये उघडण्याची शक्यता : उदय सामंत
उपचारादरम्यान १२ ऑगस्ट रोजी पहाटे महेश पाटील याचा मृत्यू झाला. सदर घटनेप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी मयत महेश पाटील यांची आई कलावतीबाई सुरेश पाटील ( ५२ ) यांनी उमरी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून खुशाल मोहनराव पाटील , आदित्य खुशाल पाटील , सुनिता खुशाल पाटील , त्र्यंबक माधवराव पाटील , शैलेश त्र्यंबक पाटील , मारुती उर्फ मनोज अशोक पाटील सर्व राहणार निमटेक अशा सहा जणांविरुद्ध उमरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड , पोलीस निरीक्षक मोहन भोसले , सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. टी. शेवाळे , उपनिरीक्षक संजय अटकोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
हेही वाचा - थरारक ! नांदेडमध्ये भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यावर गोळीबार