लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : केंद्र शासनाच्या प्रस्तावित असलेल्या तीन तलाक कायद्याच्या विरोधात रविवारी नांदेडात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आदेशाने मुस्लिम मुत्तहिदा महाजच्या वतीने महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐतिहासिक धरणे आंदोलन झाले़ प्रथमच नांदेडात हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाजातील महिला रस्त्यावर उतरल्या होत्या़ यावेळी महिलांनी तीन तलाकचा कायदा हा शरीयतमध्ये हस्तक्षेप करणारा असल्याचे सांगत त्याबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला़ या ऐतिहासिक आंदोलनाचे केलेले उत्कृष्ट नियोजन आणि आंदोलनकर्त्या महिलांची शिस्त सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला़
केंद्रातील मोदी सरकारने मुस्लिम महिलांच्या हिताच्या नावाखाली तीन तलाकच्या विरोधात लोकसभेत विधेयक मंजूर केले असून राज्यसभेत ते प्रलंबित आहे़ हा कायदा शरीयतमध्ये हस्तक्षेप करणारा असून महिलांमध्ये या कायद्याबद्दल प्रचंड रोष असल्याचे रविवारी धरणे आंदोलनात सहभागी हजारो महिलांवरुन स्पष्ट झाले़ यावेळी व्यासपीठावर असलेल्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला सदस्यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर कडाडून हल्लाबोल केला़एकीकडे मोदी मुस्लिम महिलांच्या हितासाठी प्रयत्न करीत असल्याचे दाखवित आहेत अन् दुसरीकडे मूठभर महिलांना सोबत घेवून इस्लाम धर्मातील मूळ शिकवणीच्या विरोधात कायदा करण्याचा प्रयत्न करीत आहेत़ या कायद्याला मुस्लिम महिलांचा कडाडून विरोध आहे़ परंतु मुस्लिम महिलांचा या कायद्याला पाठिंबा असल्याचा खोटा प्रचार सरकारकडून केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला़देशात जवळपास २२ लाख महिला पुरुषापासून विभक्त राहतात़ त्यात मुस्लिम महिलांची संख्या फक्त २ लाख आहे़ त्यात केवळ ५४ हजार तीन तलाकची प्रकरणे आहेत़ सरकारला त्या २० लाख महिलांच्या हिताची काळजी नसून केवळ मुस्लिम समाजाच्या शरीयतमध्ये हस्तक्षेप करण्याचा हा उपद्व्याप करण्यापेक्षा मोदींनी देवदासी प्रथेविरोधात बोलावे असे आव्हानही महिलांनी दिले़मोदी सरकारकडून मुस्लिमांवर सातत्याने अन्याय करण्यात येतो, परंतु नेमका आताच मुस्लिमांचा एवढा कळवळा सरकारला कसा काय आला? असा प्रश्नही आंदोलनकर्त्या महिलांनी उपस्थित केला़आंदोलनानंतर महिलांनी केली परिसराची स्वच्छतादुपारी पावणेदोन वाजता सामूहिक प्रार्थनेनंतर आंदोलनाचा समारोप करण्यात आला़यावेळी ज्या रस्त्याने महिला आंदोलनस्थळी दाखल झाल्या होत्या़ त्याच मार्गाने त्यांना परत जाण्याची सूचना केली जात होती़ रस्ता मोकळा झाल्यानंतर महिला स्वयंसेवकांनी रस्त्यावर पडलेले पाणी पाऊच, पाण्याच्या बाटल्या, इतर कचरा उचलला़ महिला कचरा उचलत असल्याचे पाहून पुरुषांनीही त्यांना हातभार लावला़ काही वेळातच या रस्त्यावरील सर्व कचरा उचलण्यात आला होता़ मुस्लिम समाजातील अनेकांनी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी स्टॉल लावले होते़ त्याचबरोबर वजिराबाद भागातील व्यापाºयांनीही आंदोलन यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले़ शेवटी आयोजकांनी या सर्वांचे आभार मानले़आंदोलनाचे उत्कृष्ट नियोजनप्रथमच मुस्लिम समाजातील महिलांचे आंदोलन होणार असल्यामुळे आयोजकांनी या आंदोलनाचे नेटके नियोजन केले होते़ आंदोलनासाठी ३०० हून अधिक महिला स्वयंसेवकांना तैनात करण्यात आले होते़ आंदोलनस्थळी हजारो महिला एका रांगेत शिस्तबद्धपणे तब्बल चार तास बसून वक्त्यांची भाषणे ऐकत होत्या़ हजारो महिला आंदोलनकर्त्यांमध्ये असलेली शिस्त या आंदोलनाच्या माध्यमातून पहावयास मिळाली़ स्वयंसेवकांकडून या महिला आंदोलनकर्त्यांना पाणी आणि बिस्कीटे पुरविण्यात येत होती़ कुठेही गडबड नाही की गोंधळ नाही़ त्यामुळे संयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनाचे सर्वांनीच कौतुक केले़महिलांसाठी शेकडो वाहनांची व्यवस्थामहिलांना आंदोलनस्थळी घेवून येण्यासाठी प्रत्येक भागातून आॅटो, खाजगी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती़ सकाळी त्या-त्या भागातून वाहनाद्वारे या महिलांना आंदोलनस्थळी आणण्यात आले़ ही सर्व वाहने हिंगोली गेट परिसरात पार्क करण्यात आली होती़ तसेच महिलांना त्या-त्या वाहनांसाठीचा क्रमांक देण्यात आला होता़ आंदोलन झाल्यानंतर महिला पायी हिंगोली गेट परिसरात पोहोचल्या़ या ठिकाणाहून त्यांना वाहनाने घरापर्यंत सोडण्यात आले़वाहतूक नियोजनासाठी स्वयंसेवक सरसावलेहजारोंच्या संख्येने महिला आंदोलनात सहभागी होत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी शेकडो पुरुष स्वयंसेवक रस्त्यावर उभे होते़ वाहनधारकांना ते कोणत्या रस्त्याने जायचे आहे़ याबाबत सांगत होते़ त्याचबरोबर वाहनांची गर्दी होवू नये म्हणून पोलिसांनाही सहकार्य करीत होते़ त्यामुळे आंदोलन संपल्यानंतरही शहरात कुठेही वाहतुकीचा खोळंबा झाला नाही, हे विशेष़शरीयतमध्ये हस्तक्षेपाचा सरकारचा प्रयत्नलोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : लोकसभेत बहुमताच्या जोरावर तीन तलाक कायद्याला मंजुरी देण्यात आली़ परंतु आता राज्यसभेत हे बिल अडकले आहे़ या बिलाच्या माध्यमातून सरकारकडून शरीयतमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप डॉ़ नसरीन परवीन यांनी केला़डॉ़ परवीन म्हणाल्या, सरकारने इतर विकासकामांमध्ये लक्ष घालायचे सोडून जाणीवपूर्वक मुस्लिम धर्मामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी लुडबूड सुरु केली आहे़ त्यामुळे या कायद्याच्या विरोधात मुस्लिम महिला एकजुटीने देशभरात धरणे, मोर्चे काढत आहेत़ तीन तलाकचे विधेयक हे मुस्लिम महिलांवर अन्याय, अत्याचार करणारे आहे़ त्यामुळे हा कायदा कोणतीही मुस्लिम महिला, तिचे कुटुंबिय मान्य करु शकणार नाहीत़, असेही डॉ़ परवीन म्हणाल्या़तर डॉ़ आयेशा पठाण यांनी या कायद्यात सर्व प्रकारच्या तलाकचा समावेश असल्याचे सांगितले़ ज्या महिलांना त्यांच्या पतीने अद्याप सोडले नाही किंवा नांदविले नाही़, अशा २४ लाख महिला सध्या देशात आहेत़ हा कायदा आमच्या पतीच्या अन् आमच्याही विरोधात आहे़ त्यामुळे या कायद्याला आम्ही विरोध करीत आहोत़यावेळी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्या प्रा़ मुनिसा बुशरा आबेदी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर सडकून टीका केली़ त्या म्हणाल्या, मोदी सरकारने मुस्लिम महिलांच्या हिताची चिंता करण्यापेक्षा देवदासी प्रथेविरोधात बोलावे़ मुस्लिम महिलाच्या हिताच्या नावाखाली शरीयतमध्ये हस्तक्षेप करण्याचा सरकारने घाट घातला आहे़ परंतु शरीयतमध्ये कोणताही हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही़ मूठभर मुस्लिम महिलांना समोर करुन लाखो महिलांवर या कायद्यामुळे अन्यायच होणार आहे़ त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली़