नांदेड : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यात स्वत:ला राजकीय नेते म्हणविणारे मात्र यावर ठाम भूमिका न घेता पळवाटा शोधत आहेत. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी माझा लढा असून, त्यासाठीच आरक्षण बचाव रॅली काढणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ॲड. आंबेडकर म्हणाले, जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण द्यावे, सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. त्यावर वंचितने भूमिका घेतली. इतर पक्षांना पत्र देऊन भूमिका लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली. परंतु, खोपर्डी असो मराठा आरक्षणाचा प्रश्न स्वत:ला नेते म्हणविणारे भूमिका घेतच नाहीत. जरांगे आणि हाकेंना काय शब्द दिला तो आधी सांगा, असे म्हणत आहेत. परंतु, ओबीसीतून आरक्षण द्यायचे की नाही? हाच एकमेव प्रश्न आहे. त्यावर पक्षांनी भूमिका मांडणे महत्त्वाचे आहे.
ओबीसींचे आरक्षण एका जीआरवर
एससी, एसटी संविधानिक आरक्षण आहे, तर ओबीसींचे आरक्षण हे एका जीआरवर आहे. १९९० नंतर कुणी त्याला संविधानिक करण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत, असे आंबेडकर यांनी सांगितले.