संस्कृती मंच महाराष्ट्रने निर्मिती केलेला व विजय जोशी यांनी दिग्दर्शित केलेला ही मायभूमी, महाराष्ट्र भूमी हा महाराष्ट्रातील लोककला, लोकसंगीत व लोकनृत्यांची ओळख असणारा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात रविंद्र खोमणे आणि विजय जोशी यांच्या नटरंग उभा या गाण्याने झाली. त्यानंतर जोत्स्ना स्वामी निलावार यांनी घागर घेऊन घागर घेऊन ही गवळण सादर केली. रवींद्र खोमणे यांनी माझे माहेर पंढरी हे भक्तिगीत तसेच लख्ख पडला प्रकाश हा गोंधळ तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठबळ देणारे साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांचे माझी मैना गावाकडं राहिली ही छक्कड सादर केली. जोत्स्ना स्वामी निलावार या गायिकेने तुम्हावर केली मी मर्जी बहाल ही लावणी, अरे खोप्यामध्ये खोपा ही ओवी आणि मराठमोळं गाणं तसेच गुणी बाळ असा हे अंगाई गीत अशी दर्जेदार लोकगीते सादर केली.
कोरोना युध्दाच्या काळात संघर्ष करत गेली अनेक वर्षे काम करीत असलेल्या कोरोना योद्ध्यांसाठी प्रार्थना करत महाराष्ट्र लवकर कोरोना मुक्त होऊ दे, ही प्रार्थना करून परमेश्वराला आर्जव केला. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे हे गीत सादर करून सर्व श्रोत्यांना वेगळ्या विश्वात नेले. दीपक अंभोरे आणि त्यांच्या संचाने वाघ्या मुरळी आणि जरीच्या चोळीला ही लोकगीतावर आधारित नृत्य सादर करून महाराष्ट्राच्या परंपरेची आगळीवेगळी ओळख करून दिली. शाहीर किशोर धारासुरे आणि संच यांनी पोवाडा सादर केला.