नांदेड: शहरात रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुुमारास जमिनीतून गूढ आवाज येत भूकंपाचे धक्के जाणवले. एकदम जाणवलेल्या धक्यामुळे घरातील नागरिक रस्त्यावर आल्याचे पहायला मिळाले. शहरातील व्हीआयपी रोड, शिवाजी नगर, श्रीनगर, विवेक नगर रामराव पवार मार्ग, पावडेवाडी नाका, गणेशनगर, वजिराबाद, विसावानगर या परिसरात जमिनीतून गूढ आवाज आला अन् भूकंपाचा सर्वांनाच हादरा बसला. त्यामुळे अनेकांची एकच धावपळ झाल्याने नागरिक रस्त्यावर आले.
दरम्यान, रविवारी सांयकाळी सव्वासहा वाजता शहरातील काही भागात धक्के जाणवल्याची माहिती मिळाली. याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेशी संपर्क साधला असून, तेथील शास्त्रज्ञ यासंदर्भात माहिती घेत आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सांगितले होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंप मापन यंत्रावर दहा किमी अंतराच्या परिसरात रविवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता १.५ रिष्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. भूगर्भातील आवाजासंदर्भात नागरिकांनी घाबरू नये. -अभिजित राऊत, जिल्हाधिकारी नांदेड.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत हिवाळ्यात विशेषता काही भागात जमिनीतून असे आवाज येत होते. त्यात गणेशनगर, श्रीनगर या भागातील नागरिक तर रात्रीच्यावेळी जागरण करीत होते. त्यात रविवारी पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.