Nagar Panchayat Election Result 2022: नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध; अर्धापूर,नायगावमध्ये कॉंग्रेसची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 13:23 IST2022-01-19T13:22:27+5:302022-01-19T13:23:17+5:30
Nagar Panchayat Election Result 2022: काँग्रेसचा एकहाती विजय, तर भाजपचे पानिपत झाले

Nagar Panchayat Election Result 2022: नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध; अर्धापूर,नायगावमध्ये कॉंग्रेसची सत्ता
नांदेड : जिल्ह्यात झालेल्या तीन नगरपंचायत निवडणुकीत अर्धापूर आणि नायगाव मध्ये काँग्रेस ने एकहाती सत्ता मिळवली. तर माहूर मध्ये काँग्रेस दुसऱ्या स्थानी परंतु निर्णायक अवस्थेत आहे. भाजपचे या निवडणुकीत मात्र पानिपत झाले आहे.
ओबीसीच्या राखीव जागा सोडून उर्वरित जागासाठी 21 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर ओबीसी च्या जागांवर खुल्या प्रवर्गातुन मंगळवारी मतदान घेण्यात आले. तर बुधवारी सकाळ पासून मतमोजणी ला सुरवात झाली होती. दुपारी बारा वाजेपर्यंत तिन्ही नगर पंचायती चे निकाल हाती आले. त्यात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जोरदार यश मिळविले आहे. नायगाव नगर पंचायतीत विरोधकांचा सुपडा साफ करीत सर्वच्या सर्व 17 जागांवर यश मिळविले.
तर चव्हाण यांच्या मतदार संघातील अर्धापूर नगर पंचायतीच्या 17 जागांपैकी काँग्रेस 10, भाजप 2, एमआयएम 3, राष्ट्रवादी 1 तर एक जागा अपक्षाने पटकाविली. या ठिकाणी काँग्रेसच्या हाती सत्ता देण्यात आली आहे. राष्ट्रवादी चे प्राबल्य असलेल्या माहूर मध्ये काँग्रेसने जोरदार लढत देत 17 पैकी 6 जागा मिळविल्या. तर राष्ट्रवादी 7, सेना 3 आणि भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले. या ठिकाणी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी काँग्रेसचा हात धरावा लागणार आहे. दरम्यान माहूर आणि नायगाव येथे भाजपचे आमदार असताना ही या ठिकाणी भाजपचा अपेक्षित कामगिरी करता आली नाही. नायगाव मध्ये तर भाजप आमदार राजेश पवार यांना खातेही उघडता न आल्याने जबर धक्का बसला आहे.