गडगा : महावितरण कंपनीने वीजबिलांच्या थकबाकीपोटी घरगुती ग्राहकांवर कारवाई केल्यानंतर आता आपला मोर्चा शेतकऱ्यांची कृषिपंप वीजजोडणी खंडित करण्याकडे वळवला आहे. दिनांक ११ फेब्रुवारीपासून नायगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कृषिपंपांचा वीजपुरवठा थेट डीपीवरूनच तोडण्यात आला असून, ऐन रब्बी हंगामात शेतकरी दुष्काळाच्या झळा सहन करत असतानाच वीजपुरवठा खंडित केल्याने रब्बी हंगामातील पिके वाळण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य माणूस अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. या कालावधीत घरगुती, व्यावसायिक वीज ग्राहकांकडे लाखो रुपयांचे वीजबिल थकले आहे. परिणामी महावितरण कंपनीने बिलांची वसुली मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, महावितरण कंपनीने आता आपला मोर्चा कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याकडे वळवला आहे. ११ फेब्रुवारीपासून नायगाव तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कृषिपंपाचा वीजपुरवठा थेट डीपी (ट्रान्सफार्मर)वरूनच तोडण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारीसह भुईमूग ही पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने जाहीर केलेली गतवर्षीच्या दुष्काळी अनुदानाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या हातात पडलेली नाही. त्यामुळे उसनवारी करून रब्बीची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडल्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शासनाने शेतीपंपाचा वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी कोलंबी, मांजरम, मोकासदरा, गडगा, नावंदी, केदारवडगाव, टेंभुर्णी, आलूवडगाव, कार्ला त. मा., रातोळी, माहेगाव, मुगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांनी केली आहे.