कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे कोणत्याही बारमध्ये पालन होताना दिसत नाही. उलट रात्री १० पर्यंतची वेळ असतानादेखील बहुतांश बार १२ वाजेपर्यंत सुरू असल्याचे दिसून येत आहे. नांदेड शहरातील छत्रपती चाैक, मालेगाव रस्ता, पासदगाव परिसर, रेल्वेस्थानक परिसर, काैठा परिसर, श्रीनगर आणि शिवाजीनगर येथील बार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत आहेत. त्यांना रात्री १० वाजेपर्यंतच्या नियमांचे बंधन नसल्याचेच दिसून येत आहे. तर बीअर शाॅपी आणि एकदोन वाइन शाॅपही रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही.
शहरातील बाफना ते मोंढा या रस्त्यावर असलेल्या काही हाॅटेल्स, काैठा परिसर तसेच आसना नदी, पासदाव, निळा रस्ता आदी ठिकाणी असणा-या बहुतांश ढाब्यांवर अवैधरीत्या दारूची विक्री होते. तसेच रात्री उशिरापर्यंत ग्राहक मद्यप्राशन करत बसतात. या ठिकाणी मद्य पिण्यासाठी खास व्यवस्था केल्याचे दिसून येते. दरम्यान, काही शासनमान्य बारमध्ये रात्री उशिरा येणा-या ग्राहकांना वेगळे दर लावून त्यांची आर्थिक लूटही केली जाते. त्यावरही प्रशासनाचे नियंत्रण नाही.
चौकट
शहरात २२८८ हाॅटेल्स
जिल्ह्यात जवळपास दोन हजार २८८ हाॅटेल्स आहेत. त्यापैकी केवळ ३५० बीअर-बार आहेत. उर्वरित ठिकाणी शाकाहारी, मांसाहारी जेवण मिळते. परंतु, मद्य मिळत नाही.
शाकाहारी हाॅटेल्स जास्त
जिल्ह्यातील हाॅटेल्सची संख्या पाहता बहुतांश हाॅटेल्स ही शाकाहारी आणि विविध प्रकारासाठी नावाजलेली आहेत. पुणे, मुंबईप्रमाणे नांदेडातही सुरूची भोजन देणारे हाॅटेल्स आहेत.
बालकामगारांचा वापर
१८ पेक्षा कमी वय असणा-या बालकामगारांना काम लावू नये, असा नियम असताना शहराभोवताली असलेल्या बार, ढाब्यांवर सर्रासपणे बालकामगार आढळून येतात.
किमती नियंत्रित नाहीत
जिल्ह्यातील बारमधील विदेशी मद्यांच्या किमतीवर नियंत्रण नसल्याचे दिसून येते. एमआरपीवर प्रत्येक बारचालक त्याला वाटेल तेवढे जादा पैसे आकारतो. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
परवानाधारक बार, वाइन शॉप वेळेत बंद करण्याबाबत त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून अवैध दारूविक्रीवर अंकुश मिळविण्यासाठी गस्त पथक आणि भरारी पथके कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून अवैध दारूविक्री करणा-यांच्या मुसक्या आवळल्या जातात. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हेही दाखल केले आहेत.
- निलेश सांगडे, अधीक्षक उत्पादन
जिल्हाधिका-यांच्या आदेशाला केराची टोपली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची हाॅटेल्स, बारचालकांकडून पायमल्ली होताना दिसत आहे. या ठिकाणी नियमांचे पालन होत नाही. रात्री १० नंतर मद्यविक्रीची दुकाने तसेच बार बंद करण्याचे आदेशात नमूद असतानाही शहरातील तसेच शहर परिसरातील बहुतांश बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतात.