हदगाव - ज्या तालुक्याने नांदेड जिल्हा परिषदेला अध्यक्षपद दिले, ज्या लोकांनी काँग्रेसला हदगाव पालिकेची सत्ता दिली, त्यामुळे शहराचा विकास होईल अशी कल्पना हदगाववासीयांनी मांडली खरी, मात्र आज शहराची वाताहत झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प, अतिक्रमणे, सांडपाण्याचा निचरा आदी समस्या कायम आहेत.
२०१४ मध्ये काँग्रेसच्या शांताबाई जवळगावकर नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. त्यामुळे शहरातील लोकांनी काँग्रेसच्या हाती हदगाव पालिकेची सत्ता दिली. जिल्हा परिषद अध्यक्षा व नगराध्यक्ष दोघे मिळून शहराचा विकास करतील अशी अपेक्षा हदगाववासीयांची होती. मात्र झाले उलटेच, असलेले रस्ते खराब झाले. दुसरीकडे वेगवेगळ्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शहरात आला. थातूरमातूर कामे करून कंत्राटदार गब्बर झाले. मात्र हदगाववासीयांच्या समस्या सुटल्या नाहीत.
मागील २० ते २५ वर्षापासून प्रलंबित असलेल्या सांडपाणी, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रकल्प जैसे थे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील अतिक्रमणे हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी मोठा विरोध झाला. अतिक्रमणाचा प्रश्न आजही कायम आहे. माळोदे गल्ली, राठी चौक येथील सांडपाण्याचा निचरा योग्य रीतीने होत नाही. एक लाख रुपयांचे बल्ब याठिकाणी बसवण्यात आले होेते. मात्र तेही वर्ष-सहा महिन्यात बाद झाले. संत रोहिदास सांस्कृतिक सभागृहासाठी १ कोटी रुपयांचा निधी आला होता. सभागृहात आजही गेले तरी १ कोटी खर्च सभागृहावर झाले असावे असे दिसत नाही. ठिकठिकाणी दलित वस्ती फ्लोअरचे काम झाले मात्र एका वर्षात त्यातील अर्धे रस्ते उखडून गेले.
हदगाव पालिकेत विरोधी पक्ष नावालाच आहे. कामाच्या नावाखाली विरोधकांनाही काही मलिदा वाटण्याचा उपक्रम पालिकेतील संबंधितांनी राबविल्यामुळे विरोधकही बोलण्यास तयार नाही. त्यामुळे दाद मागावी कुठे असा सवाल शहरवासीयांनी केला आहे.