- प्रा .गंगाधर तोगरे.
कंधार ( नांदेड ) : राज्यशासन जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविणार आहे. यातून शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार आहे. त्यात कंधार तालुक्यातील 30 गावाची निवड करण्यात आली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी हा प्रकल्प हवामान बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन राबविला जाणार आहे. यामुळे यात निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांना प्रगती साधण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाल्याचे मानले जात आहे. हवामान बदलाने शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळ, नापीकी, जमीन आरोग्य, भूगर्भातील पाणी साठा धोक्यात आला आहे.त्यामुळे हवामान बदलाशी जुळवून घेऊन शेती समृध्द करणे,उत्पन्न व उत्पादन वाढविण्यासाठी हा प्रकल्प राबविला जाणार आहे. सहा वर्षांत तीन टप्पात हा प्रकल्प राबविला जाईल. गावातील गरजेनुसार पाणलोट आधारित कामे व उपाययोजना करण्यात येणार आहेत. कृषी विभागामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती लाभार्थी निवड करणार आहे. निवड करताना अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी जो अनु.जाती,अनु.जमाती, महिला, दिव्यांग आदिना प्राधान्य क्रम राहणार आहे.
सध्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनात असलेल्या अनुदान मर्यादा,प्रचलित मापदंड, व निकष या प्रकल्पाला लागू असल्याचे सांगण्यात आले आहे.ग्राम सभेतून प्रकल्पाची माहिती देण्यात आली.जनजागरण केले जात आहे. या प्रकल्पातून शेती प्रगतीसाठी प्रयत्न होणार आहेत. त्याचा लाभ किती होणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.