तालुक्यात दोन टप्प्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत ३० गावांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आलेगाव, औराळ, बामणी प.क., बिंडा, चौकी महाकाया, चौकी धर्मापुरी, चिखली, चिंचोली प.क., दहिकळंबा, दाताळा, गुंडा, हळदा, हिस्से औराळ, मजरे वरवंट, मजरे सांगवी, नंदनवन, सावळेश्वर, आदी गावांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात बाचोटी, देवयाचीवाडी, गोगदरी, गोणार, जाकापूर, कल्लाळी, पेठवडज, रुई, सावरगाव नि., शिरसी बु., शिरशी खू., येलूर, आदी गावांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत विविध घटकांचा समावेश आहे.
या योजनेअंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, फळबाग लागवड, रेशीम शेती, मधुमक्षिका पालन, शेततळे, नाडेप कंपोस्ट, गांडूळखत, आदी वैयक्तिक लाभाच्या घटकांकरिता ग्रामसंजीवनी समितीच्या मंजुरीसह अर्ज करता येतात. गावातील संबंधित समूह संघटक व कृषी साहाय्यक यांच्याशी संपर्क साधून शेतकरी बांधवांनी वैयक्तिक लाभाची मागणी नोंदवायची आहे. प्रकल्पांतर्गत गावातील शेतकरी गटांनी कृषी अवजारे बँक यात ट्रॅक्टर, बीबीएफ यंत्रांसह इतर ट्रॅक्टरचलित अवजारे व त्यासाठी शेडची उभारणी या सामुदायिक घटकांसाठी २० लाख रुपयांपर्यंत प्रस्ताव सादर करता येतो. त्यासाठी ६० टक्के अनुदान उपलब्ध आहे.
शेतीमालावर आधारित प्रक्रिया केंद्र, गोदाम यांसारखे सामूहिक घटकांसाठी प्रस्ताव दाखल करता येतात. योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी ६० टक्क्यांपासून ते ८० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. तालुक्यातील इतर गावांतील शेतकऱ्यांना प्रकल्पांतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे सामूहिक घटकांचा लाभ घेता येईल. त्यात अवजारे बँक, शेतमाल प्रक्रिया केंद्र, गोदाम अशा घटकांचा लाभ घेता येईल. त्यासाठी अनुदानाची मर्यादा ६० टक्के आहे.
.................................
चौकट
तालुक्यातील ८ हजार १५९ शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केले असून ३ हजार ४८४ जणांनी मागणी नोंदविली आहे. समूह साहाय्यक, कृषी साहाय्यक स्तरावरून २ हजार ९६७ लाभार्थींची पडताळणी करण्यात आली आहे.२ हजार ९२० जणांना विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांनी ऑनलाईन पूर्वसंमती दिली; तसेच १ हजार १६३ शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली. ६२८ शेतकऱ्यांना योजनेतून डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभ खात्यात हस्तांतरित करण्यात आला असल्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी सांगितले.
जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे,नांदेडचे उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, कंधार तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडल कृषी अधिकारी, कंधार बारूळ, पेठवडज, कृषी पर्यवेक्षक, कृषी साहाय्यक, समूह संघटक यांच्या मदतीने तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.