नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेने नव्याने सुरू केलेली नांदेड - औरंगाबाद - नांदेड अशी नवीन विशेष गाडी आजपासून धावणार आहे़ दरम्यान, रेल्वेने पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे़ त्यानुसार सदर गाडी औरंगाबाद येथून सायंकाळी ५ वाजता सुटणार आहे़
दक्षिण मध्ये रेल्वे प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार नवीन विशेष गाडी ३ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत चालविण्यात येणार आहे़ रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस सदर गाडी धावेल़ ही गाडी नांदेड येथून सकाळी ८ वाजता सुटेल़ त्यानंतर पूर्णा स्थानकावरून साडेआठ वाजता, परभणी-९़०८ वाजता, मानवत रोड - ९़३६, सेलू - ९़४५, परतूर- १०़२६, रांजनी १०़३६, जालना - ११़१२, बदनापूर - ११़२३ वाजता तर मुकुंदवाडी स्थानकावरून १२़०६ वाजता सुटून औरंगाबाद स्थानकावर १२़४५ वाजता पोहोचेल़
परतीच्या प्रवासासाठी सायंकाळी ५ वाजता औरंगाबाद येथून नांदेडसाठी गाडी सुटेल़ त्यानंतर मुकुंदवाडी - ५़१२, बदनापूर - ५़५०, जालना - ६़१३ वाजता, रांजणी - ६़३८, परतूर -६़५०, सेलू - ७़२६, मानवत रोड - ७़४०, परभणी - ८़०५, पूर्णा स्थानकावर ८़३५ वाजता तर नांदेड येथे रात्री १० वाजता पोहोचेल़ सदर गाडीला आठ डब्बे असणार आहेत़ औरंगाबादसाठी नवीन विशेष रेल्वे सोडल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे़
नांदेड ते औरंगाबाद जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यातच नांदेड येथून औरंगाबाद जाणाऱ्या प्रवाशांसाठी धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस गाडी सोयीस्कर ठरते़ त्यामुळे या गाडीला तुडुंब गर्दी राहत आहे़ त्यानंतर साडेनऊ वाजता सुटणारी सचखंड आणि सव्वा दहा वाजेची तपोवन एक्स्प्रेस नांदेड येथून निघते़ परंतु, सदर गाडीमधील बहुतांश प्रवाशांचे आरक्षण असते़ त्याचबरोबर सदर प्रवासी मुंबई, मनमाड तसेच सचखंड एक्स्प्रेसला दिल्ली, अमृतसर व उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते़ सध्या या गाड्यांचे पंधरा पंधरा दिवस आरक्षण मिळत नाही़ त्यामुळे नांदेड ते औरंगाबाददरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करीत मराठवाडा एक्स्प्रेसने प्रवास करणे हाच पर्याय होता़ परंतु, दक्षिण मध्य रेल्वेने नव्याने नांदेड - औरंबाद- नांदेड विशेष गाडी चालविण्याचे ठरविल्याने प्रवाशांची अडचण दूर झाली आहे़