नांदेड: मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यात राजकारण पेटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर ठाकरे सरकार नव्या मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. राज्यात एका बाजूला भोंग्यांवरून राजकारण सुरू असताना नांदेडमधल्या एका गावानं आदर्श घालून दिला आहे. मुदखेडमध्ये येणाऱ्या बारड ग्राम पंचायतीनं पाच वर्षांपूर्वीच प्रार्थनास्थळांवरून लाऊड स्पीकर हटवले. विशेष म्हणजे त्यावेळी कोणताही वाद झाला नाही.
नांदेडच्या बारड गावानं धार्मिक एकतेचं अनोखं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. गावात ऊसासह भाज्या आणि फुलांची शेती होते. बारड ग्रामस्थ प्रामुख्यानं ऊस आणि केळीची लागवड करतात. गावची लोकसंख्या १५ हजारांच्या आसपास आहे. गावात सर्व जातीधर्मांचे लोक गुण्यागोविंदानं राहतात. बारडमध्ये १५ हिंदू मंदिरं, बौद्ध विहार, जैन मंदिर आणि मशीद आहे.
२०१८ पर्यंत सर्वच प्रार्थनास्थळांवर जवळपास २४ तास लाऊड स्पीकर सुरू असायचे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण व्हायचं. म्हणूनच ग्रामस्थांनी सगळ्याच धार्मिक स्थळांवरील लाऊड स्पीकरवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला. याचा सकारात्मक परिणाम आज दिसत आहे. गावात सर्वधर्मसमभाव कायम आहे. धार्मिक एकतेचं अनोखं उदाहरण बारड ग्रामस्थांनी राज्यासमोर ठेवलं आहे.