नांदेड : नांदेडातीलविमानसेवेला सध्या ‘अच्छे दिन’ आले असून अनेक विमानसेवा या ठिकाणाहून सुरु करण्यात आल्या आहेत़ आता नवीन वर्षापासून नांदेड ते चंदिगड ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे़ त्यामुळे सिमलासह अनेक पर्यटनस्थळी अवघ्या काही तासांत पोहोचणे शक्य होणार आहे़केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उड्डाण योजनेअंतर्गत बंद पडलेल्या नांदेड विमानतळावरुन पुन्हा विमाने आकाशात झेपावण्यास सुरुवात झाली़ सुरुवातीला नांदेड-मुंबई ही विमानसेवा सुरु करण्यात आली होती़ त्यानंतर नांदेड-हैदराबाद, नांदेड-दिल्ली यासह नांदेड-अमृतसर ही विमानसेवाही सुरु करण्यात आली आहे़ या विमानसेवांना नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ नांदेडात जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने देश-विदेशातील भाविक दर्शनासाठी येतात़ विमानसेवेमुळे त्यांची गैरसोय दूर झाली आहे़त्यात आता नांदेडहून चंदिगडसाठी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे़ त्यामुळे सिमला यासह इतर पर्यटनस्थळी अवघ्या काही तासांत पोहोचता येणार आहे़ येत्या ८ जानेवारीपासून ही सेवा सुरु होणार असल्याची माहिती एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली आहे़ त्याचबरोबर येत्या काळात नांदेडहून नागपूर आणि पुणे या ठिकाणीही विमानसेवा सुरु करण्याबाबत हालचाली सुरु आहेत़ या सर्व विमानसेवांना नांदेडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोन-दोन महिने वेटींग राहत आहे़अवघे २ तास २० मिनिटांत पोहोचेल चंदीगडला
- एअर इंडियाकडून नांदेडातून दिल्ली आणि अमृतसरसाठी आठवड्यातून दोन दिवस विमानसेवा चालविण्यात येते़ तर मुंबई आणि हैद्राबादसाठी दररोज विमाने आहेत़ आता येत्या ८ जानेवारीपासून नांदेड-चंदीगड विमानसेवा सुरु होणार आहे़
- एअर इंडियाच्या या विमानाची क्षमता १६६ प्रवाशांची असून त्यापैकी १२ बिझनेस क्लास तर १५० सिट इकॉनॉमी असतील़ चंदीगड येथून हे विमान दर मंगळवार आणि बुधवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी निघेल़ त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता ते नांदेडात पोहोचेल़
- परतीच्या प्रवासात नांदेड येथून दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी निघेल आणि चंदिगड येथे दुपारी अडीच वाजता पोहोचेल़ नांदेडहून २ तास २० मिनिटांत चंदीगडला पोहोचता येणार आहे़ विमानाचे सुरुवातीचे तिकीट दर हे सहा हजार रुपये असतील, अशी माहिती हाती आली आहे़