नांदेड - शहरानजीक खडकी भागात पोलिसांनी जीपमधून स्फोटकाचा अवैध साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या साठ्यात स्फोटकाच्या चौदाशे काड्या व इडीचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांन ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, विशेष पोलिस पथकाला आज सकाळी एक जीप शहरानजीक खडकी भागात संशयास्पद स्थितीत आढळून आली. पथकाने या जीपची तपासणी केली असता जीपमध्ये सुपर पॉवर कंपनीची स्फोटके आढळून आली. यात स्फोटकाच्या चौदाशे काडया व इडी चा समावेश आहे. अधिक तपास करत पोलिसांनी या प्रकरणी नथुराम साळवी आणि देविलाल साळवी या दोघांना ताब्यात घेतले आहे.
या दोघांकडे स्फोटकांच्या खरेदी -विक्रीची कसलीही कागदपत्रे दिसून आली नाहीत. यामुळे पोलिसांनी ४२ हजाराच्या मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली. दरम्यान, पोलिसांनी भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ सह कलम २८६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सपोनि उमाकांत चिंचोलकर यांनी दिली.