नांदेड : केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत नांदेड महापालिका हद्दीत पाणीपुरवठा योजनेसाठी २४ कोटी १२ लाख रुपये केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी मंजूर केले असले तरी या योजने अंतर्गत केली जात असलेली कामे वादाच्या भोवर्यात सापडली आहेत. पाणीपुरवठा विभागाकडून कोणती कामे केली जात आहेत, याबाबत अद्यापही पारदर्शकता आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमृत अभियानांतर्गत नांदेड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी अतिरिक्त वितरण व्यवस्थेचे काम हाती घेण्यात आले आहे. ८ फेब्रुवारी २०१७ रोजी या प्रकल्पास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. आगामी ३० वर्षांतील लोकसंख्या अपेक्षित धरुन पाणीपुरवठा योजनेची कामे महापालिका करणार आहे. त्यामध्ये गांधी पुतळा येथे पाण्याची टाकी उभारली जाणार आहे. त्याचवेळी शहराच्या विविध भागात ४५० मि.मी. ते २५० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. शहरात जवळपास १३२.५७ कि.मी. लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम या योजनेतून केले जाणार आहे. त्याचवेळी या योजनेतून केली जाणारी कामे वादाच्या भोवर्यातच सापडली आहेत.
अमृत योजनेतून शहरातील नगिनाघाट गुरुद्वारा भागात सुरू केलेले काम ऐनवेळी बंद करण्यात आले. विशेष म्हणजे, हे काम संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते सुरू करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दोन तासांतच या कामाला आडकाठी आणण्यात आली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सदर उद्घाटनाचा कार्यक्रम आम्हाला माहीतच नव्हता, अशी भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे, या उद्घाटन सोहळ्यास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील तत्कालीन अधिकार्यांच्या बदलत्या भूमिकेचे कारण काय? असा प्रश्नही पुढे आला आहे. महापौर शीलाताई भवरे यांच्या प्रभागातील कामही अमृत योजनेतून सुरू करण्यात आले आहे. या कामाच्या दरम्यानही स्थानिक नगरसेवकांना डावलल्याची तक्रार करण्यात आली होती.
अमृतच्या कामासंदर्भातील तक्रार नगरसेवक गुरुप्रीतकौर सोडी यांनी विधानमंडळ अंदाज समितीकडेही केली आहे. त्यामुळे जवळपास २४ कोटींची ही कामे कुठे केली जात आहे़ याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पारदर्शकता ठेवली जात असल्याने हा निधी कागदावरच खर्च केला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. गुरू-त्ता-गद्दी कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा व मलनि:सारणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता तीच कामे पुन्हा दाखवून निधीची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.