लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी प्रकल्प उशाला असलेल्या नांदेडकरांना मागील आठ ते दहा वर्षापासून किमान दिवसाआड तर कमाल तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मात्र आता शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्याची तयारी महापालिकेकडून केली जात आहे. पाणी गळती रोखल्यास दररोज पाणीपुरवठा शक्य होईल, असा विश्वास आयुक्त लहुराज माळी यांनी व्यक्त केला आहे.महापालिका पदाधिकाऱ्यांकडून ईदपूर्वी शहरात दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या जोरदार पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पात चांगला जलसाठा झाला आहे. शहराच्या पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल करण्याची तयारी पाणीपुरवठा विभागाने केली. दररोज अथवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी येणाºया तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. यात मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीचे काम, पंपींग काम, जलकुंभ भरण्यासाठी लागणारी पंपींग व्यवस्था तसेच मनुष्यबळाचा आढावा घेण्यात आला. त्याचवेळी महापालिकेने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याचे कामही हाती घेतले. या मोहिमेत आतापर्यंत सर्व्हिसिंग सेंटर, हॉटेलसाठी अनधिकृतपणे घेतलेली जोडणी शोधून काढली. तसेच त्याला सीलही करण्यात आले.या सर्व प्रक्रियेत शहराला आता दररोज पाणीपुरवठा करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. खुद्द आयुक्त माळी हे दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी सकारात्मक आहेत. शहरात होणारी पाण्याची गळती रोखल्यास दररोज पाणीपुरवठा शक्य आहे.अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु आहे. पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा करण्याची बाब शक्य आहे, असे माळी म्हणाले.त्यामुळे शहरवासीयांना आता आठ ते दहा वर्षांनंतर दररोज पाणीपुरवठा होऊ शकतो.शासकीय वसतिगृहालाही अनधिकृत नळजोडणीशहरातील वजिराबाद येथे असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहालाही अनधिकृत नळजोडणी असल्याचे महापालिकेच्या मोहिमेत स्पष्ट झाले आहे. महापालिकेने ही अवैध नळजोडणी शोधून वसतिगृहाच्या कार्यालयाला सील ठोकले. वजिराबाद पोलीस ठाण्याजवळ असलेल्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहात मुख्य जलवाहिनीवरुनच अनधिकृत नळजोडणी घेतली होती. शहरात ही मोहीम सुरुच राहणार आहे. अनधिकृत नळजोडणी घेणाºयांना आपल्या जोडण्या नियमितही करता येणार आहेत. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.
...तर नांदेड शहराला होईल दररोज पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 1:04 AM
विष्णूपुरी प्रकल्प उशाला असलेल्या नांदेडकरांना मागील आठ ते दहा वर्षापासून किमान दिवसाआड तर कमाल तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे
ठळक मुद्देशहरात पाणी गळती रोखण्यासाठी मनपाचे युद्धपातळीवर प्रयत्न