नांदेड प्रतिष्ठेची लक्षवेधी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:33 AM2019-04-17T04:33:36+5:302019-04-17T04:34:00+5:30
काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा़डॉ़यशपाल भिंगे यांच्यात चुरस आहे़ प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती़
नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार रिंगणात असले, तरी काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा़डॉ़यशपाल भिंगे यांच्यात चुरस आहे़ प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती़
विकासकामाचा मुद्दाच राहिला प्रचारात
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा उमेदवार अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे़ काँग्रेसकडे उपलब्ध असलेल्या तगड्या यंत्रणेद्वारे चव्हाण यांनी प्रचाराची राळ उडवून दिली. जिल्ह्यात आणलेले विविध प्रकल्प, तसेच केलेल्या विकासकामावर चव्हाण यांचा भर होता़ काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘न्याय’ योजना मतदारांपर्यंत पोहोचविण्यात चव्हाण यशस्वी झाल्याचे दिसून आले.
भाजपच्या प्रचारात मोदी केंद्रस्थानी
काँगे्रसच्या अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना मैदानात उतरवून ही लढत चुरशीची बनविली. चिखलीकर यांनी चव्हाण यांच्यावर शेलकी टीका केली. चव्हाण यांच्या ताब्यातील संस्थांना टीकेचे लक्ष्य बनविले. भाजपने संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे उभी केली. नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांचा प्रचारात भर दिसून आला. मोदी, मोदी आणि मोदी हेच त्यांच्या प्रचाराचे सूत्र होते.
>हेही उमेदवार रिंगणात
नांदेड लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने तिरंगी लढत होत असली, तरी नोंदणीकृत राजकीय पक्षाचे अब्दुल रईस अहेमद, अब्दुल समद, मोहन वाघमारे, सुनील सोनसळे तर अपक्ष म्हणून श्रीरंग कदम, अशोक चव्हाण, मनीष वडजे, माधवराव गायकवाड, रणजीत देशमुख, शिवानंद देशमुख हेही उमेदवार रिंगणात होते़ सर्वच उमेदवारांनी जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला़