नांदेड : वयोवृद्ध असलेल्या आईचा छळ करुन तिच्या नावे असलेले घर आपल्या नावावर करुन घेणाऱ्या मुलगा आणि सुनेविरोधात भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणात जेष्ठ नागरीक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे़ या कलमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात ही पहिलीच कारवाई असावी़
जानकाबाई दाजीबा बंडाळे (८०) रा़ विवेकनगर असे वृद्ध महिलेचे नाव आहे़ त्यांचा मुलगा चंद्रकांत दाजीबा बंडाळे आणि सून सुनिता चंद्रकांत बंडाळे यांनी २००८ पासून त्यांचा छळ सुरु केला आहे़ जानकाबाई यांच्या नावावर असलेले २० खोल्यांचे घरही मुलगा आणि सूनेने आपल्या नावावर करुन घेतले़ त्यानंतर त्यातील दोन खोल्या या जनाबाई यांना राहण्यासाठी दिल्या़ परंतु त्यानंतरही जानकाबाई घर सोडण्यास तयार नसल्यामुळे चिडलेल्या दोघांनी जानकाबाई यांच्या खोलीची नळजोडणी बंद केली़ तसेच वीजपुरवठाही तोडला़ जानकाबाई घर सोडून जाव्यात यासाठी मुलगा आणि सूनेने अनेक प्रकारे त्यांना त्रास दिला़ खर्चासाठी जानकाबाई यांनी पैसे मागितल्यास त्यांना शिवीगाळही करण्यात येत होती
याबाबत जानकाबाई यांनी २२ जून रोजी भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले़ त्यानंतर मुलगा आणि सूनेच्या विरोधात तक्रार दिली़ या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी चंद्रकांत बंडाळे व सुनिता बंडाळे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़ या प्रकरणाचा तपास पोना. व्ही. पी. आलेवार हे करीत आहेत़ दरम्यान, ज्येष्ठ नागरीक आणि पालक यांचे पालन पोषण या कलमाखाली नांदेडात हा पहिलाच गुन्हा असावा़
उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणीज्येष्ठ नागरीक आणि पालक यांना पाल्याकडून रुग्णालयाचा खर्च, राहण्याची व्यवस्था व इतर खर्च मिळत नसल्यास त्याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याची प्रत जोडून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येते़ या अर्जावर उपविभागीय अधिकारी त्वरित निर्णय देतात़