नांदेड: देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. साबणे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा असतांना, त्यांच्या प्रवेशापूर्वीच त्यांना उमेदवारी जाहीर करून भाजपने इच्छुकांना धक्का दिला आहे. (Nanded : Deglaur-Biloli Assembly by-election; BJP nominates Subhash Sabne )
देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही जागेसाठी ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्यात आणि सुभाष साबणे यांच्यामध्ये काही वेळ चर्चा झाली.
तीन वेळा आमदार राहिले आहेत साबणे - भाजपकडून देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. साबणे हे यापूर्वी तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. मुखेड विधानसभा मतदार संघातून दोन वेळा तर देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात एकवेळ त्यांचा विजय झाला आहे. २००९ च्या निवडणुकीमध्ये सुभाष साबणे यांचा पराभव करून रावसाहेब अंतापूरकर हे विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष साबणे यांनी रावसाहेब अंतापुरकर यांचा पराभव केला होता. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला. दुर्दैवाने रावसाहेब अंतापुरकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणुक होत आहे.
पुन्हा अंतापूरकरविरूद्ध-साबणे!आजघडीला राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने देगलूर बिलोली विधानसभेची जागा काँग्रेसला गेल्याने नाराज साबणे यांनी भाजपची वाट धरली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांच्यासह सहा जणांनी उमेदवारी मागितली आहे. परंतु, यासंदर्भात अंतिम निर्णय दिल्लीत होणार असल्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, काँग्रेसची उमेदवारी जीतेश अंतापूरकर यांनाच मिळेल, असे मानले जात आहे. तसे झाले तर पुन्हा अंतापूरकर विरुद्ध सुभाष साबणे अशी लढत होईल. त्यात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण? इतर पक्षाची भूमिकाही महत्वपूर्ण ठरणार आहे.