नांदेड : प्रवाशांची मागणी लक्षात घेता नांदेडहूनदिल्लीसाठी १९ नोव्हेंबर २०१८ रोजी विमानसेवा सुरु करण्यात आली होती. ही सेवा आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार अशी सुरु आहे. यातच प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन नांदेडहून दिल्लीसाठी आणखी एक नवी फेरी दर शनिवारी सुरु करण्यात येणार आहे. यामुळे दिल्लीसाठी आता नांदेडकरांना आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा मिळणार असल्याचे नांदेड येथील एअर इंडिया स्टेशनचे व्यवस्थापक गजेंद्र गुठे आणि अजय भोळे यांनी सांगितले.
सचखंड गुरुद्वारामुळे देशाच्या विविध भागातून भाविकांचा नांदेडकडे दर्शनासाठी ओढा असतो. या बरोबरच वाढत्या उद्योगामुळे हैदराबाद, अमृतसर, मुंबई, दिल्लीसह चंदीगडला जाणाऱ्या प्रवाशांची संंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावरुन मुंबई, दिल्लीसाठी विमानसेवा सुरु करण्याची शहरवासियांची मागणी होती. त्यातच आता नव्याने ८ जूनपासून नांदेड-दिल्ली-नांदेड अशी दर शनिवारसाठी नवी सेवा उपलब्ध होणार आहे. दर शनिवारी दिल्लीहून हे विमान दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटेल व नांदेड येथे सायंकाळी ५ वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. पुन्हा नांदेडहून दिल्लीसाठी सदर विमान सायंकाळी ५.४५ वाजता निघेल आणि रात्री ६ वाजून ३५ मिनिटांनी दिल्ली येथे पोहोचेल. या प्रवासाचे सुरुवातीचे शुल्क हे ४ हजार ३०९ रुपये इतके असणार आहे. तर सदर विमानाची प्रवासी क्षमता १२२ इतकी असून या विमानात आठ बिझनेस क्लास तर ११४ इकॉनॉमिक क्लास उपलब्ध राहणार आहेत.
विविध ठिकाणी विमानसेवाकेंद्र शासनाच्या उड्डान योजनेअंतर्गत नांदेड विमानतळावरुन विविध ठिकाणी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. टू-जेटकडून हैदराबाद-नांदेड-मुंबई आणि मुंबई-नांदेड-हैदराबाद अशी दररोज विमानसेवा सुरु आहे. च्एअर इंडियाची नांदेड-चंदीगड ही विमानसेवा सुरु आहे. चंदीगडसाठी आठवड्यातून मंगळवार आणि बुधवारी तर दिल्लीसाठी सोमवार आणि गुरुवारी, अमृतसरसाठी रविवार आणि शनिवार विमानसेवा आहे.