भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:49 AM2019-04-17T00:49:36+5:302019-04-17T00:51:48+5:30
राज्यात गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणूक नाही, कारखाने नाहीत, रोजगार नाही़ गेल्या ४५ वर्षांत जेवढी नाही तेवढी यावेळी बेरोजगारी वाढली आहे़ भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला असून काँग्रेसची सत्ता आल्यास नांदेडातच रोजगार निर्माण करण्यात येईल़
नांदेड : राज्यात गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणूक नाही, कारखाने नाहीत, रोजगार नाही़ गेल्या ४५ वर्षांत जेवढी नाही तेवढी यावेळी बेरोजगारी वाढली आहे़ भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला असून काँग्रेसची सत्ता आल्यास नांदेडातच रोजगार निर्माण करण्यात येईल़ नांदेडच्या तरुणांना बाहेर जाण्याची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोंढार येथे आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री नसीम खान, आ़डी़पी़सावंत यांची उपस्थिती होती़ चव्हाण म्हणाले, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान जाळले जात असताना भाजपा सरकार मात्र गप्प बसले होते़ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय जनहितकारी निर्णय घेतात़ मात्र भाजप सरकार तेच घेतलेले निर्णय पुन्हा न्यायालयाकडे पुनर्विचारासाठी पाठविते़ देशात अशाप्रकारे हुकूमशाही कारभार सुरु असल्याचा घणाघात खा़अशोकराव चव्हाण यांनी केला़
कॉग्रेस पक्ष स्वायत्त, संविधानिक संस्थांना स्वतंत्रता देणारा पक्ष आहे़ तर भाजप, आरएसएस संविधान मानत नाहीत़ विचार थोपविण्याचे तसेच प्रत्येक संस्थेवर आरएसएसच्या व्यक्तीचा सहभाग ठेवणे हेच एकमेव काम सुरु आहे़ असेही ते म्हणाले़ तर हॉटेल सिटी प्राईडमध्ये बुद्धिजीवी वर्गाची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत चव्हाण म्हणाले, भाजपाने देशातील व्यापाऱ्यांना चोर ठरविले आहे़ जीएसटी, नोटाबंदी करुन वाताहत केली आहे़ देशात प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे़ परंतु पंतप्रधानांनी चार्टर्ड अकाऊंटन्ट यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून दम दिला, असेही ते म्हणाले़ यावेळी अॅड़विजय भोपी, अॅड़सिद्दीकी, जयप्रकाश फलोर, गुणाल मालपाणी, अॅड़भोसले, अॅड़हांडे, रहेमान सिद्दीकी, गोविंद मुंदडा यांची उपस्थिती होती़
शीख बांधवांशी साधला संवाद- गुरुद्वारा गेट क्रमांक ५ येथे अशोकराव चव्हाण यांनी शीख बांधवांशी संवाद साधला़ गुरुद्वारामुळेच नांदेडची ओळख असून भाजपाच्या काळात धर्मामध्ये ढवळाढवळ करण्यात येत आहे़ काँग्रेसने अशी ढवळाढवळ कधीही केली नाही़ परंतु भाजपच्या काळात मात्र सरकार गुरुद्वाराच्या प्रबंधनाचा चेअरमन ठरवित आहे़ कारण पंतप्रधानांना त्या जागी आरएसएस-भाजपाचा व्यक्ती पाहिजे़ पीएमच्या ‘मन की बात नसून दिल की बात’ ची गरज आहे़ भाजप सरकार देश आणि राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे़ कोणी काय खायचं, काय बोलायचं, कोणते कपडे घालायचे हे सरकारच ठरवित आहे़ विचार थोपवून सर्वसामान्यांवर अन्याय करणा-या सरकारला खाली खेचा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले़ यावेळी विरेंद्रसिंघ गाडीवाले, नरेंद्र चव्हाण, रवींद्रसिंघ बुंगई, डिम्पल नवाब, प्रकाशकौर खालसा, रणजितसिंघ कामठेकर आदी उपस्थित होते.