नांदेड : जिल्ह्यात ८९ वाळूघाटांची ई-लिलाव प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत २९ वाळूघाटांचा लिलाव झाला असून पहिल्या फेरीत जिल्हा प्रशासनाला १७ कोटी ६५ लाख ७४ हजार ७१० रुपयांचा महसूल मिळणार आहे.
जिल्ह्यातील ८९ वाळूघाटांच्या लिलावासाठी ३० नोव्हेंबर रोजी दुसºया टप्प्यात ई-निविदा मागविल्या होत्या. १८ डिसेंबर रोजी या आॅनलाईन निविदांची तांत्रिक तपासणी करण्यात आली. या सर्व ई-प्रक्रियेत जिल्ह्यातील २९ वाळूघाटांना ठेकेदारांनी बोली लावली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ७ वाळूघाट बिलोली तालुक्यातील आहेत. तर प्रत्येकी ५ वाळूघाट देगलूर, नायगाव आणि उमरी तालुक्यात आहेत. मुदखेड तालुक्यात १, लोहा ३, हिमायतनगर १, माहूर १ आणि हदगाव तालुक्यातील एका वाळूघाटाचा लिलाव झाला आहे.
जिल्ह्यात गतवर्षी ३१ वाळूघाटांच्या लिलावातून १३ कोटी ९० लाख २७ हजार ४०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. त्या तुलनेत यंदा वाळूघाट लिलावाच्या पहिल्याच फेरीत जवळपास ४ कोटी रुपये जादा महसूल मिळाला आहे. लिलाव झालेल्या २९ वाळूघाटांपैकी देगलूर तालुक्यातील शेवाळा वाळूघाटास १ कोटी ९० लाख ६ हजार ६९९ रुपये अशी सर्वोच्च बोली मिळाली आहे. त्याखालोखाल देगलूर तालुक्यातील शेळगाव- २ या वाळूघाटास १ कोटी ८५ लाख ४ हजार ९५०, शेळगाव- २ या वाळूघाटास १ कोटी ७९ लाख ९ हजार ९६६ तर बिलोली तालुक्यातील बोळेगाव-२ या घाटास १ कोटी ११ लाख ३१ हजार १६६ रुपये किंमत मिळाली आहे़
गोपनीय माहिती पोहोचली होती ठेकेदारांपर्यंतजिल्ह्यात ६ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत १०४ वाळूघाटांच्या ई-लिलाव प्रक्रियेला प्रारंभ केला होता. या प्रक्रियेत गोपनीय माहिती ठेकेदारांपर्यंत पोहोचल्याची बाब उघड झाली होती. त्यामुळे गौण खनिज अधिकारी रणज्योतसिंघ सोखी यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांची विभागीय चौकशी सुरु आहे. त्यानंतर नव्याने झालेल्या ई-लिलाव प्रक्रियेत पहिल्या फेरीत प्रशासनाला १७ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.